कोल्हापूर : टिप्पर चालकांचा संप; कचरा उठाव ठप्प | पुढारी

कोल्हापूर : टिप्पर चालकांचा संप; कचरा उठाव ठप्प

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणार्‍या टिप्पर वाहनाच्या चालकांनी पगार न मिळाल्याने मंगळवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन केले. दुपारपर्यंत चालकांचा संप राहिल्याने शहरातील बहुतांश भागातील कचरा उठाव ठप्प झाला. सुमारे शंभरांवर चालक बुद्ध गार्डनमधील वर्कशॉपमध्ये बसून होते. महापालिकेचे अधिकारी, खासगी कंपनीच्या प्रतिनिधींनी चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरले. दरम्यान, शिवकृपा एंटरप्रायजेसचे चालक आंदोलनात सहभागी झाले नसल्याने निम्मी वाहने कचरा संकलनासाठी फिरत होती.

शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेने 169 टिप्पर वाहने घेतली आहेत. त्यासाठी दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांकडून चालक घेतले आहेत. प्रत्येक महिन्याला करारानुसार मनपा संबंधित कंपन्यांना बिल देते. तरीही डी. एम. एंटरप्रायजेस या कंपनीने चालकांचा गेल्या महिन्यातील पगार अद्याप दिलेला नाही. त्यामुळे गेले काही दिवस चालकांतून संताप व्यक्त करण्यात आला. मंगळवारी सकाळी सहा वाजता सर्व चालक वर्कशॉपमध्ये एकत्र आले. मात्र पगार मिळत नसल्याने चालक रोष व्यक्त करत होते. त्यातूनच अचानक काम बंद आंदोलन केले. त्यानुसार टिप्पर वाहने घेण्यासाठी येणार्‍या सर्वांना थांबवून आंदोलनात सहभागी करून घेतले.

उदरनिर्वाह कसा करायचा?

घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी वर्कशॉपमध्ये आले. त्यांच्यासह डी. एम. कंपनीच्या व्यवस्थापकाला चालकांनी धारेवर धरले. वेळेवर पगार का करत नाही? आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? टिप्पर वाहने दुरुस्त केली जात नाही? दिवस भरले नाहीत तर पगार कपात केली जाते? मग जबाबदार कोण? आदी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

शनिवारपासून बेमुदत आंदोलन…

आपचे संदीप देसाई व अभिजित कांबळे यांनी चालकांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर देसाई व कांबळे यांनी शुक्रवारपर्यंत किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपाला पत्र देऊ. हा प्रश्न सुटला नाही तर शनिवारपासून (दि. 24) बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानंतर कचरा संकलनासाठी सर्व चालक बाहेर पडले.

डी. एम.वर कारवाई का नाही?

104 टिप्पर वाहनांसाठी डी. एम. एंटरप्रायजेसकडून 107 चालक घेण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याला महापालिकेच्या वतीने त्यांचे बील दिले जाते. परंतु त्यांच्याकडून चालकांना वेळेवर पगार दिला जात नाही. परिणामी गेल्या वर्षभरात या कंपनीच्या चालकांनी चारवेळा अशाप्रकारे अचानक काम बंद करून शहरास वेठीस धरण्याचा प्रकार घडला आहे. तरीही महापालिका प्रशासन संबंधित कंपनीवर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Back to top button