पणजी : योगक्षेत्र आणि भगवान परशुरामाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण | पुढारी

पणजी : योगक्षेत्र आणि भगवान परशुरामाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पणजी; पुढारी वृतसेवा : गोवा सरकार तर्फे पणजी येथील मांडवी नदीच्या किनाऱ्यावर योगक्षेत्र, योग सेतू, योग दालन, योग मुद्रा, तपो दालन असे विविध प्रकल्प उभारण्यात आले असून या प्रकल्पाच्या मध्यभागीच गोव्याची निर्मिती ज्यांनी केली त्या भगवान परशुरामाचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज जागतिक योग दिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे सर्व प्रकल्प लोकार्पण केले.
यावेळी पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरीश अडकोणकर व इतर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गोवा हे जागतिक पर्यटनाचे केंद्र आहे. गोव्याची राजधानी पणजी असल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांना आणि इतर नागरिकांनाही दिवसभर समुद्रकिना-यावर सैर करणे सोयीचे व्हावे, त्याचबरोबर योगाला जागतिक मान्यता मिळालेले आहेच. तो सर्वत्र पोचावा व योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी मांडवी किनारी योग क्षेत्र उभारण्यात आले आहे. भगवान परशुराम यांनी गोमंतकाची निर्मिती केल्याची आख्यायिका सांगितली जाते, त्यामुळे भगवान परशुरामाचा पुतळा येथे उभारण्यात आलेला आहे. ३३,६८,०६,७५५ रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आलेला असून या प्रकल्पाचे काही काम बाकी आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रकल्पाचे भव्य असे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. यात मिरामार ते कांपाल असा दोन किलोमीटर सायकल ट्रॅक, पणजीतील बालोद्यान ते कलाअकादमी योग क्षेत्र, कांपाल येथील बालोद्यान ते मिरामार पर्यंत किनारा नूतनीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“गोवा ही भोगभुमी नाही तर योग भूमी आहे. हे दर्शवण्यासाठी आणि योग घराघरात पोचावा यासाठी या ठिकाणी योग्य प्रात्यक्षिकासह अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत. कदंब काळाची आठवण करून देण्यासाठी प्रवेशद्वारावर सिहांचे पुतळे उभारण्यात आल्याचेही सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button