Ashes 2023 : तब्बल 75 वर्षांनी प्रथमच ‘ॲशेस’मध्ये घडली ‘अशी’ घटना, जाणून घ्या आकडेवारी | पुढारी

Ashes 2023 : तब्बल 75 वर्षांनी प्रथमच ‘ॲशेस’मध्ये घडली ‘अशी’ घटना, जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲशेस मालिकेची (Ashes 2023) सुरुवात इंग्लंडसाठी (England) चांगली झालेली नाही. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने (Australia) बेन स्टोक्सच्या (Ben Stoks) यजमान संघावर 2 विकेट्स राखून रोमांचक विजय मिळवला. याचबरोबर कांगारूंनी पाच सामन्यांच्या मालिकेत संघ 1-0 ने आघाडी घेतली. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात अनेक नवे विक्रम रचले गेले आहेत. यावर एक नजर टाकूया…

‘ॲशेस’मध्ये 1948 नंतर पहिल्यांदाच… (Ashes 2023)

1948 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने ॲशेस कसोटीच्या (Ashes 2023) चौथ्या डावात 250 धावांच्या वरच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी 1948 मध्ये हेडिंग्ले येथे असे घडले होते. त्यावेळी कांगारूंनी चौथ्या डावात 404 धावा करून सामना जिंकला होता. ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियासाठी हे चौथे सर्वात मोठे आव्हान आहे. 1949 ते 2022 दरम्यान 31 ॲशेस कसोटी सामने झाले आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियासमोर चौथ्या डावात 250+ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण एकदाही त्यांना विजय मिळवता आला नाही. यादरम्यान ऑस्ट्रेलियाला 31 पैकी 18 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, तर उर्वरित सामने अनिर्णित राहिले.

ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाने केलेला लक्ष्याचा पाठलाग (Ashes 2023)

404/3 (धावा) 114.1 (षटके) 404 (लक्ष्य) लीड्स 1948
315/6 (धावा) 134.0 (षटके) 315 (लक्ष्य) ॲडलेड 1902
287/5 (धावा) 134.1 (षटके) 286 (लक्ष्य) मेलबोर्न 1929
282/8 (धावा) 92.3 (षटके) 281 (लक्ष्य) बर्मिंगहॅम 2023
276/4 (धावा) 62.4 (षटके) 275 (लक्ष्य) सीडनी 1898

यापूर्वी 2011 मध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग

यापूर्वी 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाने 250 च्या वर लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या डावात कांगारूंनी 310 धावा केल्या. त्या सामन्यात नवोदित पॅट कमिन्सने इम्रान ताहिरला चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने 250+ धावसंख्येचा पाठलाग करताना 21 पैकी 19 सामने गमावले आहेत.

इंग्लंडकडून सलग 26 डावांत ‘ऑलआऊट’!

एजबॅस्टन कसोटीपूर्वी (edgbaston test) सलग 26 डावात इंग्लंडने चौथ्या डावात प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट केले होते. ऑस्ट्रेलियाने 1999 ते 2001 दरम्यान सलग 33 डावांमध्ये आणि इंग्लंडने 1885 ते 1896 दरम्यान 59 डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे.

सलग कसोटी डावांमध्ये सर्वाधिक ऑलआऊट!

इंग्लंड : 59 : 1885-1896
ऑस्ट्रेलिया : 33 : 1999-2001
इंग्लंड : 26 : 1978-1979
इंग्लंड : 26 : 2022-2023
द. आफ्रिका : 25 : 2017-2018

8 कसोटींमध्ये कांगारूंचा ‘असा’ रोमांचक विजय

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत केवळ 8 कसोटी सामन्यांमध्ये 2 किंवा त्यापेक्षा कमी विकेट्स राखून सामना जिंकण्याची किमया केली आहे. यापूर्वी 2011 मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत त्यांनी यजमान द. आफ्रिकेवर रोमहर्षक विजयाची नोंद केली होती. त्यावेळी 310 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी 8 विकेट गमावल्या होत्या. दरम्यान, ॲशेस 2023 च्या (Ashes 2023) पहिल्या कसोटीत इंग्लंडला चौथ्या डावात 8 विकेट्स मिळवूनही ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांच्या 8 फलंदाज तंबूत पाठवूनही विजयाने हुलकावणी देण्याचीही इंग्लिश संघाची ही केवळ पाचवी वेळ आहे.

अ‍ॅशेसमध्ये दोनदाच ‘असे’ घडले…

अ‍ॅशेसमध्ये याआधी दोनदाच असे घडले आहे जेव्हा एखाद्या संघाने पहिला डाव घोषित केला आणि गमावला. 1981 च्या लीड्स कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 8 बाद 401 वर घोषित केला होता. त्या सामन्यात त्यांचा 18 धावांनी पराभव झाला होता. तर 2006 च्या अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात 6 बाद 551 धावा करूनही इंग्लंडला तो सामना सहा विकेट्सनी गमवावा लागला होता.

पाठलाग करताना सर्वोच्च भागीदारी

कमिन्स आणि नॅथन लायन यांच्यात नवव्या विकेटसाठी नाबाद 55 धावांची भागीदारी झाली. नवव्या किंवा दहाव्या विकेटसाठी चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करताना कसोटी इतिहासातील ही सातवी सर्वोच्च भागीदारी आहे. ऑस्ट्रेलियासाठी ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. याआधी 1907 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सिडनी कसोटीत टिब्बी कॉटर आणि गेरी हॅझलिट यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद 56 धावांची खेळी केली होती आणि 274 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.

अॅशेस कसोटींत सर्वाधिक मिनिटे फलंदाजी करणारे फलंदाज

ॲलिस्टर कुक (इंग्लंड) : 302 (धावा) : 596 (चेंडू) : 908 (मिनीट) : ब्रिसबेन-2010
हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड) : 303 (धावा) : 871 (चेंडू) : 810 (मिनीट) : मेलबर्न-1925
लेन हटन (इंग्लंड) : 364 (धावा) : 847 (चेंडू) : 797 (मिनीट) : द ओव्हल-1938
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) : 206 (धावा) : 518 (चेंडू) : 796 (मिनीट) : बर्मिंगहॅम-2023
बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया) : 315 (धावा) : 749 (चेंडू) : 767 (मिनीट) : मॅन्चेस्टर-1964

ख्वाजाची 796 मिनिटे फलंदाजी

एजबॅस्टन कसोटीत (edgbaston test) उस्मान ख्वाजाने 796 मिनिटे फलंदाजी केली. मार्क टेलरच्या 938 मिनिटांनंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजाची ही दुसरी सर्वात मोठी खेळी आहे. टेलरने 1998 च्या पेशावर कसोटीत पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी केली होती. वेळेचा विचार करता, अॅशेसमधील कोणत्याही फलंदाजाची ही चौथी सर्वोच्च आणि ऑस्ट्रेलियासाठी सर्वोच्च खेळी ठरली आहे. या आधी बॉब सिम्पसनने 1964 मध्ये मँचेस्टर कसोटीत 767 मिनिटे फलंदाजी केली होती.

कसोटीच्या पाचही दिवशी फलंदाजी…

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त 13 वेळा असे घडले आहे की जेव्हा एखाद्या फलंदाजाने कसोटीच्या पाचही दिवस फलंदाजी केली. ख्वाजाने एजबॅस्टन कसोटीत अशी कामगिरी केली. तो किम ह्युजेसनंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. ह्यूजने 1980 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळताना कसोटीच्या पाचही दिवशी फलंदाजी केली होती.

कूकनंतर अॅशेस कसोटीत 500 हून अधिक चेंडू खेळणारा ख्वाजा हा एकमेव फलंदाज

ख्वाजाने या सामन्यात 518 चेंडू खेळले. 2012 नंतर कसोटीत 500 पेक्षा जास्त चेंडू खेळणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्यापूर्वी रिकी पाँटिंगने 2012 च्या अॅडलेड कसोटीत ही कामगिरी केली होती. 2010 मध्ये अॅलिस्टर कूकनंतर अॅशेस कसोटीत 500 हून अधिक चेंडू खेळणारा ख्वाजा हा एकमेव फलंदाज आहे. कुकने 2010 च्या गाबा कसोटीत 596 चेंडूंचा सामना केला होता.

लॅबुशेन-स्मिथची निच्चांकी भागिदारी

मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी या सामन्यात एकूण 35 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियासाठी विजयी सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांचे हे तिसरे सर्वात कमी योगदान आहे. 1888 च्या लॉर्ड्स कसोटीत ऑस्ट्रेलियाने 61 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामनयात हॅरी ट्रॉट आणि जॉर्ज बोनर यांनी केवळ 17 धावांचे योगदान दिले होते, तर 1882 च्या सिडनी कसोटीत बिली मर्डोक आणि टॉम होरान यांनी केवळ 27 धावांची भागिदारी केली होती.

Back to top button