पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरकॉन्टिनेंटल कपमधील विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय फुटबॉल संघ 'सॅफ' चॅम्पियनशिप २०२३ मध्ये प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरणार आहे. ( SAFF Championship ) या स्पर्धेतील आठ वेळ चॅम्पियनशिप पटकविणारा भारतीय संघाचा आज ( दि. २१) पाकिस्तानशी मुकाबला हाेणार आहे. बंगळुरूच्या कांतीराव हा सामना सायंकाळी सात वाजता सुरु हाेईल.
पाकिस्तान संघासमाेर भारताचे पारडे जड मानले जात आहे. स्पर्धेतील पहिल्या सामना जिंकण्याच्या निर्धारानेच भारतीय संघ मैदानात उतरेल. भारतीय फुटबाॅल संघाने या स्पर्धेत १९९३, १९९७, १९९९, २००५, २००९, २०११, २०१५, आणि २०२१ मध्ये विजेतेपद पटकावले होते. मालदीवने २००८ आणि २०१८ मध्ये तर बांगलादेशने २००३ मध्ये विजेतेपद पटकावले होते. यावर्षी सॅफ स्पधेचे विजेतेपद पटकवल्यास भारताला फिफा रँकिंगमध्ये गुणही मिळणार आहेत.
इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकल्यामुळे भारतीय फुटबाॅल संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले, "आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो. प्रशिक्षक कधीच समाधानी नसतो. आम्ही कठोर परिश्रम करत राहू आणि भविष्यात आणखी चांगले खेळू."
भुवनेश्वरमध्ये रविवारी लेबनॉनचा २-० असा पराभव करून भारताने इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला. लेबनॉनवर ४६ वर्षात भारताचा हा पहिला विजय होता, कर्णधार सुनील छेत्रीने भारतासाठी विजयी गोल केला होता. सॅफ चॅम्पियनशिपमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. छेत्रीने १३७ सामन्यात ८७ गोल केले आहेत. आणखी दोन गोल करून तो मलेशियाच्या मुख्तार दाहारीला (८९ गोल) मागे टाकून आशियातील दुसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरण्याची संधी त्याला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या फुटबॉल सामन्याचे ऑनलाइन प्रक्षेपण फॅनकोड (FanCode) ॲपवर हाेणार आहे.