Ashes 2023 : फलंदाज उस्मान ख्वाजाने केली कमाल, ‘हा’ अनोखा विक्रम केला नावावर! | पुढारी

Ashes 2023 : फलंदाज उस्मान ख्वाजाने केली कमाल, 'हा' अनोखा विक्रम केला नावावर!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियाचा फलंदाज उस्‍मान ख्‍वाजा याने एजबॅस्टन येथील पहिल्या ॲशेस ( Ashes 2023) :कसोटी सामन्‍यात नवा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. या कसोटीत त्‍याने पहिल्या डावात १४१ तर दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. ख्वाजाच्या दमदार फलंदाजीच्‍या जोरावर ऑस्‍ट्रेलियाला मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात विजय मिळवला. कसोटी सामन्याच्या पाचही दिवस फलंदाजीसाठी येणारा ख्वाजा जगातील १३ वा फलंदाज ठरला आहे. तर किम ह्यूजेस यांच्‍यानंतर कसोटी सामन्याच्या पाचही दिवस फलंदाजी करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.

पाचही दिवस फलंदाजी

ख्वाजा कसोटी सामन्याच्या पाचही दिवस फलंदाजी करणारा ॲशेस कसोटीच्‍या इतिहासातील केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला, ख्वाजाच्या आधी, इंग्लंडच्या जेफ बॉयकॉट (१९७७) आणि रॉरी बर्न्स (२०१९) या दोघांनी ॲशेसमध्ये खेळताना ही कामगिरी केली होती. ज्योफ १९७७ मध्ये ट्रेंट ब्रिज कसोटीत तर रॉरी बर्न्सने एजबॅस्टन कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी केली.

ख्वाजाआधी, कसोटी सामन्यात पाच दिवस फलंदाजी करण्याचा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू किम ह्यूज होता, ज्याने १९८०९ मध्ये लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाच दिवस फलंदाजी केली होती. कसोटीत असा पराक्रम करणारा भारताचा एमएल जयसिम्हा हा पहिलाच फलंदाज ठरला होता. १९६० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ईडन गॉर्डन येथे झालेल्या कोलकाता कसोटी सामन्यात त्याने पाचही दिवस फलंदाजी केली होती. त्याचबरोबर भारताकडून रवी शास्त्री आणि चेतेश्वर पुजारा यांनीही पाच दिवस फलंदाजी करण्‍याची कमाल केली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात ख्वाजाने पहिल्या डावात १४१ धावा आणि दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये खेळताना कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावणारा ख्वाजा 1989 नंतरचा पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज ठरला आहे. याआधी, १९८९ मध्‍ये मार्क टेलरने इंग्लंडमध्‍ये कसोटी खेळताना सलामीवीर म्हणून १३६ आणि ६० धावा केल्या होत्या. ख्वाजाने कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १५ शतके झळकावली आहेत, इंग्लंडविरुद्ध त्‍याने चार शतके झळकावली आहेत.

कसोटीच्या पाचही दिवस फलंदाजी केलेले खेळाडू

  • मोटगनल्ली जैसिम्हा (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १९६०
  • जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १९७७
  • किम ह्युजेस (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड – १९८०
  • ॲलन लँब (इंग्लिश: वेस्ट इंडीज) – १९८४
  • रवी शास्त्री (भारत) विरुद्ध इंग्लंड – १९८४
  • एड्रियन ग्रिफिथ (वेस्ट इंडीज) विरुद्ध न्यूझीलंड – १९९९
  • अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड) विरुद्ध भारत – २००६
  • अल्विरो पीटरसन (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध न्यूझीलंड – २०१२
  • चेतेश्वर पुजारा (भारत) विरुद्ध श्रीलंका – २०१७
  • रॉरी बर्न्स (इंजी.) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २०१९
  • क्रेग ब्रॅथवेट (वेस्ट इंडिज) विरुद्ध झिम्बाब्वे -२०२३
  • टंगेनरीन चंद्रपॉल (वेस्ट इंडिज) विरुद्ध झिम्बाब्वे – २०२३
  • उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड – २०२३

 

Back to top button