नागपूर : केवळ पुतळे नको महापुरुषांचे विचार अंगिकारण्याची गरज : नितीन गडकरी | पुढारी

नागपूर : केवळ पुतळे नको महापुरुषांचे विचार अंगिकारण्याची गरज : नितीन गडकरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केवळ पुतळे उभारण्यापेक्षा महापुरुषांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकरण्याची गरज आहे. जगण्याचे ज्ञान ग्रामगितेतून देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असलेले नागपूर विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे. ज्ञानाच्या मंदिरात आरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श, सिद्धांत व नीती आदी ज्ञानाने परिपूर्ण पिढी तयार होईल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ सर्वात मोठा ५१ फूटउंच भव्य पुतळा उभारणीचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि.१८) पार पडला. यानंतर डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत करीत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आई वडीलापेक्षा मोठे असल्याचे सांगत आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक असे या जाणता राजांचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू असल्याचे गडकरी म्हणाले. शिवशाही,रामराज्य प्रचलित शब्द आहेत. शिवशाही म्हणजेच आदर्श राज्य असून छत्रपतींच्या विचारांअनुरूप भविष्यातील पिढी घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठात भव्य ऑडिटोरियम आणि कन्व्हेन्शन सेंटर बांधले जाणार आहे. त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांवरील लाईट अँड साउंड शो करता येईल असे ते म्हणाले. ग्रामगीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत गजानन विजयग्रंथ हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे गडकरी म्हणाले.

सोबतच राजदत्त यांचे स्वप्न असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता लोक सहभागातून छत्रपतींचा पुतळा निर्माण होत असल्याचा आनंद व्यक्त करीत गडकरी यांनी ५ लाख रुपयांची मदत घोषित केली. नागरिकांनीही लोक सहभाग द्यावा असे आवाहन केले. अभिनेता रजनीकांत यांच्या चेन्नई येथील घरी शिवाजी महाराजांचा मोठा फोटो। पाहून आनंद झाल्याचे सांगितले.

यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा ३२ फुटाचा असून चबुतरा, छत्र असा एकूण ५१ फुटाचा भव्य पुतळा उभारल्या जात असल्याचे सांगितले. याच ठिकाणी संग्रहालय तसेच ग्रंथालय उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव मंगेश डुके यांनी केले. शिल्पकार सोनल कोहाड, संतोष कुर्वे, गौरव डुबेवार यांचा सत्कार करण्यात आला.

भूमीपूजनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत प्रिन्स शिवाजी राजे भोसले (तंजावर), माजी मंत्री अनिल देशमुख, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी आमदार प्रा जोगेंद्र कवाडे, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, डॉ बबनराव तायवाडे,आ अभिजित वंजारी,मोहन मते, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे,मंगेश डुके, विजयकुमार शिंदे उपस्थित होते.

तर देशावर मराठ्यांचे राज्य : प्रिन्स शिवाजी राजे भोसले

इंग्रज आले नसते तर भारतावर मराठ्यांचेच राज्य असते असे तंजावरचे प्रिन्स शिवाजी राजे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताची कल्पनाच अशक्य आहे. आता धर्म, संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपणावर असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नागपूरचे आकर्षण ठरेल. रयतेला लेकरांप्रमाणे वागविणारे छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते असे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले. शिवाजी महाराज यांनी उमेद बाळगून सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. महाराजांचा हाच आदर्श सर्वांनी कृतीत उतरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

भूमीपूजनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत प्रिन्स शिवाजी राजे भोसले (तंजावर), माजी मंत्री अनिल देशमुख, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी आमदार प्रा जोगेंद्र कवाडे, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, डॉ बबनराव तायवाडे,आ अभिजित वंजारी,मोहन मते, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे,मंगेश डुके, विजयकुमार शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा;

Back to top button