Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात | पुढारी

Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली होऊन पंधरवडा उलटला, मात्र अद्यापही नाशिक महापालिकेला आयुक्त मिळालेले नाहीत. या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तब्बल तीनदा वेगवेगळ्या एकाकडून दुसऱ्याकडे सोपविला गेला. इतिहासात बहुधा प्रथमच अशा प्रकारची वेळ नाशिक महापालिकेवर आली आहे. दरम्यान, आपल्याकडील प्रभारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून सुटीवर गेलेल्या महसूल आयुक्तांनंतर आता जिल्हाधिकारी गंगाधरन डी. हेदेखील सुटीवर गेल्याने आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे शासन आदेशात स्पष्ट केले आहे.

डॉ. पुलकुंडवार हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. डॉ. पुलकुंडवार हे पुन्हा नाशिकमध्ये परतत असतानाच त्यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यानंतर गमे यांच्याकडेच आयुक्त पदाचा पदभार कायम राहिला. मात्र, गमे हे आठ दिवसांच्या रजेवर गेल्याने सध्या जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे आयुक्त पदाचा कार्यभार होता. मागील दोन आठवड्यांपासून नाशिक महापालिकेला आयुक्त मिळत नसल्याने वाऱ्यावरची वरात असा महापालिकेचा कारभार सुरू आहे. आयुक्त पदावर कोणाची नियुक्ती होईल, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले असतानाच, शासनाने अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. नगरविकास खात्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी यासंदर्भात महापालिकेला शुक्रवारी सायंकाळी उशिरा याबाबतचे आदेश काढले आहेत.

आयुक्त कोण ?

डॉ. पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या आयुक्तपदी कोण? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. आतापर्यंत अनेकांची नावे समोर आली असली, तरी अद्यापपर्यंत कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब केले गेले नसल्याने, नाशिक महापालिकेचे आयुक्त कोण याबाबतची उत्सुकता नाशिककरांना लागून आहे. दरम्यान, राजकारण्यांच्या चढाओढीत नाशिक महापालिका वाऱ्यावर असल्याची चर्चाही आता नाशिककरांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button