सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्हीच खरे गद्दार : श्रीकांत शिंदे | पुढारी

सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्हीच खरे गद्दार : श्रीकांत शिंदे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिवसेना युतीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविंद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. शनिवारी कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता-पदाधिकारी मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी निशाणा साधला. कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ठाकरे पिता-पुत्रासह खासदार संजय राऊत यांना टार्गेट केले. हिंदुहयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले त्यांच्यासोबत आम्ही युती केली आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्ही, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्ही अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. त्यांच्यासोबतच आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचाही नामोल्लेख टाळून खासदार शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला.

बाळासाहेबांनी घडवलेली एवढी सगळी लोकं आपल्याला सोडून का गेली ? एवढे आमदार-खासदार का सोडून गेले ? आजही अनेक लोक येत आहेत. अनेक लोकांना आमच्याकडे यायचे आहे. एवढी वाताहत कशामुळे झाली ? याचे आपण थोडे तरी आत्मपरीक्षण करणार की नाही ? असे परखड सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी निधीच्या रुपात खोके दिले. खोके खोके म्हणून आम्हाला काही लोक हिनवतात. मला तर वाटते की, झोपेत देखील तसेच बरळत असतील. आम्हाला खोके खोके म्हणताय ना, हो आम्ही खोके घेतले. पण निधीच्या रुपात ते आम्हाला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ज्यातून आम्ही विकासाचे काम करतोय.

महाराष्ट्राच्या संस्कृतीत असे कधीही घडले नाही, असे वर्तन काही राजकीय नेत्यांचे आहे. आमची नावे घेतल्यावर ते थुंकतात, यापेक्षा
खालची पातळी त्यांची असू शकते. संस्कार नावाचा काही प्रकार आहे की नाही? अशी टीका खासदार शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. शिंदेंकडून वेळेचा सदुपयोग केला जातो. गावाकडे हेलिकॉप्टरने गेले असे सांगितले जाते, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. पण ते वेळेचा फायदा घेतात. सर्व लोकांचे कामे करतात. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना वेळच वेळ होती. त्यामुळे ते कार चालवत फिरत असत. एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावून तो निर्णय घेतला. त्यावेळी अस्तित्वात असलेले सरकार पडून ते मंत्री होणार याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. कारण ही युती एका विचाराने झालेली आहे. कोण मंत्री होईल ? कोण खासदार होईल यासारखी पदे ही दुय्यम आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानेच आज त्यांच्यासोबत आपण युती केल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनासाठी वेळ नाही. ज्यांच्या नावावर मते मागितली, त्यांच्या राज्याभिषेक दिनासाठीही आपल्याकडे वेळ नाही. तर सामान्यांना कसा काय वेळ देणार ? कार्यकत्यांना भेटायचे नाही की पदाधिकाऱ्यांना भेटायचे नाही. पक्ष चाललाय ना, एकनाथ शिंदेंसारखे लोक आहेत ना. लोकांना न भेटण्यावरूनच या सर्व गोष्टी झाल्या असूनही लोकांना गृहीत धरण्याचे अद्याप सोडले नसल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

युती कोणत्याही पदासाठी झालेली नाही

कोणत्याही विषयावर कार्यकर्त्यांनी संयम आणि युतीचा धर्म पाळला पाहिजे. ही युती कोणत्याही पदासाठी झालेली नाही. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याच्या विचाराने झाली आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आवरून एकत्रितरित्या काम करण्याचे आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले. मुंबईतील नगरसेवक देखील उद्धव ठाकरेंना सांभाळता येत नाहीत. अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहेत. कारण ते चोवीस लोकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांची कामेही होत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे युतीचे सरकार करत असल्याचे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेवटी बोलताना मांडले.

Back to top button