पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे नागरिकांची वाहने सुरक्षित नसताना, आता चोरट्यांनी थेट पोलिसांची वाहने चोरी करण्याचा पराक्रम केला आहे. बरं ही वाहने चोरट्यांनी थेट पोलिस आयुक्तालयासमोरूनच चोरी केली आहेत. त्यामुळे वाहन चोरट्यांना 'खाकी'चा धाक आहे की नाही, असाच सवाल निर्माण झाला आहे. मतदान प्रक्रियेच्या कालावधीत पोलिस आयुक्तालयासमोरील पार्किंगमधून तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे.
12 ते 14 मे या कालावधीत ही वाहने चोरी गेल्याचे समजते.
खरं तर दुचाकींचे शहर म्हणून पुण्याची ओळख. मात्र, हेच शहर आता वाहनचोरट्यांचे शहर म्हणून नवीन ओळख करू पाहत आहे. मागील सव्वातीन वर्षांत शहरातून 24 कोटी 68 लाखांची पाच हजार 822 वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, रिक्षा आणि मोटारींचा समावेश आहे. शहरभर सीसीटीव्हीचे जाळे असूनही, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चोरटेही सापडत नाहीत आणि चोरीची वाहनेही मिळत नाहीत. 'सद्रक्षणाय खलनिग्रहनाय' असे ब्रीद मिरविणार्या पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी ही वाहने चोरी करण्याचे धाडस करून दाखवले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने वाहन चोर्या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान कायम आहे. शहरात वाहनांची संख्या मोठी आहे. त्यातही दुचाकीची संख्या सर्वाधिक, त्यामुळे पुण्यात वाहन चोरीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहनचोरी ही पुणे पोलिसांसमोरील खर्या अर्थाने डोकेदुखी ठरत आहे. मात्र, आता पोलिस आयुक्तालयासमोर पार्क केलेली वाहनेदेखील सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.
या वर्षाच्या प्रारंभीपासूनच चोरट्यांनी वाहनचोरीचा धडाका लावल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीच्या अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीतच चोरट्यांनी तब्बल 400 वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत एक कोटी 51 लाख 84 हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे शहरातील वाहनचोरींची तीव्रता किती मोठी आहे, हे दिसून येते. दिवसाला शहरातून सहा ते सात वाहने चोरीला जात आहेत. कधी- कधी हेच प्रमाण नऊ ते दहाच्या घरात असते. वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना म्हणावे तसे यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य नागिरकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे.
तत्कालीन पोलिस आयुक्तांनी वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार केली. त्यांची उत्तर, दक्षिणमध्ये विभागणी करून कामांचे वाटप करण्यात आले. पण, या पथकांना वाहनचोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही. वाहनचोरी विरोधी पथके ही फक्त नावालाच आहेत की काय, असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. शहरात दररोज सात ते आठ वाहने चोरीला जात असताना ही पथके नेमकं करतात काय, हे पाहण्याची वेळ आली आहे. त्यांचे कामाचे मूल्यमापन वरिष्ठ आता तरी करणार की नाही, हादेखील एक मोठा सवाल आहे. एकंदर वाहन चोर्यांचे प्रमाण पाहात, त्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांनाच विशेष प्रयत्न करावे लागणार, हे मात्र नक्की.
हेही वाचा