अहमदनगर जिल्ह्यात रोज 60 हजार लिटर भेसळीचे दूध | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात रोज 60 हजार लिटर भेसळीचे दूध

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मध्यंतरी श्रीगोंद्यातील कारवाईनंतर जिल्ह्यात दररोज 60 हजार लिटर भेसळीचे दूध तयार होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पारनेरमध्येही मोठी भेसळ आहे. दुर्दैवाने अन्न व औषध प्रशासनालाही भ्रष्टाचाराने विळखा घातला आहे. त्यामुळे दूध भेसळ रोखण्यासाठी शासनाकडूनच आता कठोर पावले उचलली जात आहेत.

तसेच बोगस पशुखाद्यनिर्मिती करणार्‍या कंपन्यांवरही कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.जिल्हा बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा प्रारंभ झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, मागचे सरकार असताना दुधाला 23 रुपये भाव होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर 40 रुपये भाव आला. मात्र जिल्ह्यासह राज्यातील दूध भेसळीचे प्रमाण चिंताजनक आहे. जिल्ह्याचे दररोजचे 40 लाख लिटर दूध संकलन आहे.

मात्र या तुलनेत अन्न व औषध प्रशासनाचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यातही कायद्याचा धाक दाखवून पैसे उकळण्याचा काही मंडळींचा धंदा सुरू आहे. वास्तविकतः सामान्य जनतेला, लहान मुलांना जाणार्‍या भेसळयुक्त दुधाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या वेळी भेसळीचे हे दूध खासगी प्लॅन्ट स्वीकारत असल्याचे सांगतानाच संबंधितांवरही मंत्री विखे पाटलांनी कारवाईचे संकेत दिले. दरम्यान, दूध दर कमी देणार्‍या खासगी प्लॅन्ट, सहकारी संघावरही मंत्री विखे पाटील यांनी ताशेरे ओढताना लिटरला 40 रुपये दर देण्यास हरकत नाही. महानंदाप्रमाणे खासगी, सहकारी दूध संघाचे ऑडिट थर्ड पार्टीद्वारे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात दुधाचे दर पाहता पशुखाद्याचे भाव वाढते आहे. मात्र पशुखाद्य निर्माण करताना त्यांच्या गोणीवर कोणत्या प्रकारची सखोल माहिती नाही. हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवरही गुन्हा दाखल करण्याच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले. पुढच्या महिन्यात दूध संघ, खासगी संघाची बैठक बोलावली आहे. पशुखाद्यनिर्मित्ती करणार्‍यांसमवेतही बैठक बोलावली आहे. दुधात व पशुखाद्यातही भेसळ करणार्‍यांवर यातून कठोर कारवाई करावी लागेल, काहींची दुकाने बंद होतील, मात्र याला पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नगर शहरातील मिरवणुकीचा मार्गाबाबत त्यांनी मनपा व पोलिस प्रशासन चर्चेतून निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

गुटख्याच्या किती कारवाया केल्या?

अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडी) मनुष्यबळ कमी असल्याच्या त्यांच्या व्यथा आहेत. मात्र दुसरीकडे भ्रष्टाचाराचा एफडीला विळखा पडल्याचे दिसते. शेवगावमध्ये गुटख्याचे कारखाने आहेत, नगरमध्येही वेगळी परिस्थिती नाही. एफडीने किती गुटख्यांच्या कारवाया केल्या, याचे उदाहरण द्या, असाही सवाल मंत्री विखे पाटील यांनी केला.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरून राजकारण

शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीवरून श्रीरामपुरात तिखट प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर मंत्री विखे म्हणाले, जिल्हा विभाजनाचा आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा कोणताही संंबंध नाही. काही तालुक्यांतील लोकांना प्रशासकीय कामांना नगरला यावे लागत होते. त्यांच्या सोयीसाठी शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होत आहे. मात्र जे सत्तेत होते, त्यांच्याकडून आता यात राजकारण केले जात आहे, असा निशाणा विखे यांनी थोरातांवर साधला.

भविष्यकारांची संख्या फार झाली!

सरकार अस्तिवात आल्यापासून महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या फार झाली आहे. दुर्दैवाने त्यांचे भविष्य खरे ठरत नाही याचे त्यांना शल्य आहे. मध्यंतरी वज्रमूठ सभेत खुर्चीवरून भांडणे झाली, नेतृत्व कोणी करायचे यावरून भांडणे झाली, आता जागावाटपातून भांडणे सुरू आहेत. काही दिवसांत हे एकमेवांवरच वज्रमूठ उगारतील, असे सांगून महायुती एकत्रित निवडणुका लढविणार असल्याचेही विखे यांनी या वेळी स्पष्ट केले.

पुढे काय करायचे ते ठरवू!

आपापल्या कार्यक्षेत्रातील कारखाना निवडणुकीत बहुदा इतर नेत्यांचा हस्तक्षेप होत नाही, मात्र गणेश कारखाना निवडणुकीत थोरात आलेले आहेत, याकडे लक्ष वेधल्यानंतर मंत्री विखे म्हणाले, ‘गणेश’च्या बाबतीत असा करार थोरात आणि कोल्हेंनीही मोडला आहे. पुढे काय करायचे ते आपण ठरवू.

हेही वाचा

Nashik Police : ग्रामीण पोलिस दलात अंमलदारांच्या बदल्या

गुड न्यूज ! पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार

Ashadhi wari 2023 : यवत येथे तुकोबारायांच्या पालखीचे जंगी स्वागत ; समाज आरतीला हजारो वारकर्‍यांची उपस्थिती

Back to top button