नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट | पुढारी

नाशिक : आउटसोर्सिंगद्वारे शहरातील मृत जनावरांची लावणार विल्हेवाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मृत जनावरे उचलण्यासाठीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले असून, दि. १ जूनपासून या कामाला सुरुवात झाली आहे. मनपाने याबाबतची सेवा २४ तास उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी महापालिकेला मृत जनावरे उचलण्यापासून ते दहन करण्यापर्यंत मोठा खर्च लागायचा. मात्र, आता बालाजी एन्टरप्रायजेस या संस्थेला हे काम दिले असून, यातून महापालिकेची २४ लाखांची बचतही होणार आहे. गतवर्षी लहान-मोठ्या अशा एकूण साडेसहा हजार मृत जनावरांची विल्हेवाट महापालिकेने लावली होती.

सन २०१० पासून विल्होळी येथील खतप्रकल्पात जनावरे दहन करायची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. मोकाट मृत जनावरे पशुवैद्यकीय विभागाकडून उचलून प्रकल्पात नेत विल्हेवाट लावली जायची. तेथील विद्युतदाहिनीत एका तासाला 300 किलो वजनाचे जनावर जाळले जाऊ शकतात. यापूर्वी मृत जनावरे दफन केली जायची. परंतु आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता विद्युतदाहिनीत त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. शहरात दिवसाला 10 ते 12 जनावरे मृत पावतात. महिनाभरात हा आकडा 350 इतका आहे. यात श्वानांची सर्वाधिक संख्या आहे. गाय, म्हैस, बैल, घोडा या मोठ्या जनावरांपासून ते अगदी शेळी, मेंढी, श्वान ते उंदीर यांचाही समावेश असतो. पूर्वी महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग स्वत: ही जनावरे उचलून त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, हे काम करताना प्रत्येक विभागासाठी मनुष्यबळ व त्यांचे वेतन, वाहन, इंधन या यंत्रणेवर वर्षभरात तब्बल 50 लाखांचा खर्च येत असे.

पशुवैद्यकीय विभागाकडून आता हे काम ठेकेदाराला देण्यात आले असून, कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. दोन गाड्या व प्रत्येकी तीन-तीन कर्मचारी नेमले आहेत. या कामाचे जीपीएस यंत्रणेद्वारे मॉनिटेरिंग केले जाईल. पशुवैद्यकीय विभागाच्या हेल्पलाइनवर मृत जनावरांची माहिती मिळाल्यास ठेकेदाराला कळवली जाईल. आठवड्यातील सातही दिवस 24 तास ही सेवा द्यावी लागणार आहे. पाळीव छोट्या प्राण्यास 300, तर मोठ्या जनावरांसाठी हजार रुपये शुल्क पशुपालकाकडून आकारले जाणार आहे.

मृत जनावरांच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या हेल्पलाइन 0253 2240070 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. मृत जनावरांना विल्होळी येथील विद्युतदाहिनीत दहन केले जाते. त्यामुळे पर्यावरणासह, आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. मृत जनावरे उचलणाऱ्या संस्थेचे काम कसे सुरू आहे, याकडे लक्ष असणार आहे.

डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा

मागील वर्षाची मृत जनावरांची आकडेवारी

श्वान – ३,५८१, गाय – १,०२३, डुक्कर – १९९, म्हैस – २४६, गाढव – १७०, बैल – २१२, घोडा – १७५, मांजर – १३५, शेळी – ४३

हेही वाचा : 

Back to top button