पुढारी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने अद्याप केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तात्पुरती तारीख जाहीर केलेली नाही. पण गुजरातमधील पोरबंदरच्या दक्षिणेकडील आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकून त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनच्या केरळमध्ये येण्याच्या प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. (Monsoon update)
एका बुलेटिनमध्ये हवामान विभागाने म्हटले आहे की, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा सकाळी ५:३० वाजता गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे ९२० किमी, मुंबईपासून दक्षिण-नैऋत्येस १,१२० किमी, पोरबंदरपासून दक्षिणेस १,१६० किमी आणि पाकिस्तानच्या कराची पासून दक्षिणेस १,५२० किमी अंतरावर होता.
"हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर त्याचे पुढील २४ तासांत तीव्र चक्रीवादळात रुपांतर शक्यता आहे. अरबी समुद्रातील या शक्तिशाली हवामान प्रणालींमुळे मान्सूनची वाटचाल बिघडते. या प्रभावामुळे मान्सूनचा प्रवाह किनारपट्टीच्या भागांमध्ये पोहोचू शकतो. पण पश्चिम घाटाच्या पलीकडे मान्सूनला पोहोचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल," असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
केरळमध्ये ८ जून अथवा ९ जून रोजी मान्सूनची सुरुवात होऊ शकते. पण त्याची वाटचाल संथ असू शकते, असे खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने म्हटले आहे.
मान्सूनच्या पावसाचे आगमन यंदा अपेक्षेपेक्षा काही दिवसांनी लांबले असून बुधवारपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण अरबी समुद्रात २.१ किलोमीटर उंचीपर्यंत वेगवान वारे वाहत असल्याने मान्सूनचे आगमन लांबले आहे. केरळमध्ये मान्सून उशिराने पोहोचणार असल्याने देशाच्या उर्वरित भागातही त्याचे आगमन लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतच्या निश्चित तारखा सांगण्यात आलेल्या नाहीत. पण पुढील दोन ते तीन दिवसांत स्थिती पुरेसी स्पष्ट होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. (Monsoon update)
हे ही वाचा :