Rohit Sharma : डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी रोहित शर्माला घ्यावे लागणार ‘हे’ 3 मोठे निर्णय | पुढारी

Rohit Sharma : डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी रोहित शर्माला घ्यावे लागणार ‘हे’ 3 मोठे निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून WTC चा अंतिम सामना सुरू होणार आहे. टीम इंडियाने शानदार कामगिरी करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग दुस-यांदा प्रवेश केला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघानेही चांगला खेळ दाखवत अंतिम फेरी गाठली. दरम्यान, आता अंतिम सामन्याला काही तासच उरले आहेत. अशा स्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) उरलेल्या वेळेत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.

रवींद्र जडेजा की आर. अश्विन?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) डब्ल्यूटीसी फायनलमध्ये कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे, याकडे सा-या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांना एकत्र संधी मिळणार की एकालाच खेळवले जाणार हा सर्वात मोठा मुद्दा आहे. एकच खेळाडू खेळणार असेल तर दोघांपैकी कोण खेळेल हे ठरवणे सोपे काम नाही. टीम इंडियाचा 2021 चा कर्णधार विराट कोहलीने दोन्ही फिरकीपटूंना डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत एकत्र संधी दिली होती आणि त्या सामन्यात आर अश्विन 4 तर जडेजा 1 विकेट घेण्यात यशस्वी झाला होता.

उमेश यादव की शार्दुल ठाकूर?

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित असली तरी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरमध्ये कोणाला स्थान द्यायचे याचाही विचार कर्णधार रोहितला (Rohit Sharma) करावा लागणार आहे. हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळू शकणार नाहीत हेही जवळपास निश्चित झाले आहे. गोलंदाजीसोबतच फलंदाजी हा देखील टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा निकष असेल. शार्दुल ठाकूर फलंदाजी करू शकतो, पण उमेश यादवही गरजेच्या वेळी फटकेबाजी करू शकतो, हेही लक्षात ठेवावे लागेल.

संबंधित बातम्या

इशान किशन की केएस भरत?

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इशान किशन आणि केएस भरत यांच्यात कोणाची निवड केली जाईल. म्हणजेच टीम इंडियासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कोण खेळेल. इशान किशनने अद्याप कसोटी पदार्पणही केलेले नाही आणि केएस भरतने आतापर्यंत खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. यष्टीरक्षणाबरोबरच खेळाडूला फलंदाजीतही आपले कौशल्य दाखवता येणे आवश्यक आहे. दरम्यान, येत्या काही तासांत रोहित शर्माला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

Back to top button