Mumbai : वंचित बहुजन युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरणी गँगस्टर अबू सालेम टोळीच्या माजी शूटरसह चौघांना अटक | पुढारी

Mumbai : वंचित बहुजन युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरणी गँगस्टर अबू सालेम टोळीच्या माजी शूटरसह चौघांना अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशुर आणि प्रभाग अध्यक्ष असलेल्या गायक गौतम हराळ यांच्यावर दादरमध्ये करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कुख्यात अबू सालेम टोळीतील माजी शुटरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. भोईवाडा पोलिसांनी मुंबई आणि ठाणे येथे ही कारवाई केली आहे.

दादरमधील आंबेडकर भवन येथे २७ मे रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आयोजित बैठकीसाठी आलेल्या रणशुर आणि हराळ यांच्यावर चार अज्ञात मारेकऱ्यांनी लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी हराळ यांची फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल करुन भोईवाडा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुंबईतील दारुखाना परिसर आणि ठाण्यातून एकूण चौघांना अटक केली आहे. यात एकेकाळी गँगस्टर अबू सालेम टोळीचा शुटर असलेल्या राजेश हातणकर याच्यासह नजीर सय्यद, साकिब कुरेशी आणि कृष्णा यादव यांचा समावेश आहे.

हातणकर याच्यावर हत्येचे सात गुन्हे दाखल असून यातील पाच प्रकरणांत पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला आहे. तर, त्याच्यावर दोन खटले सुरु असल्याची माहिती मिळते. कांदिवलीतील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी हातणकर हा २०१६ पासून तुरुंगात होता. २०२२ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. त्याला याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा मुलगा सिद्धांत याने हल्ला करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली असून यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळते.

Back to top button