Virat Kohli vs Naveen Ul Haq : विराटशी पंगा नवीन-उल-हकला पडला महागात! MI कडून ट्रोल, एलएसजीनेही ‘आंबा’ शब्द केला म्यूट | पुढारी

Virat Kohli vs Naveen Ul Haq : विराटशी पंगा नवीन-उल-हकला पडला महागात! MI कडून ट्रोल, एलएसजीनेही 'आंबा' शब्द केला म्यूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli vs Naveen Ul Haq : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात आयपीएल सामन्यादरम्यान झालेला वाद अजूनही चर्चेचा विषय आहे. या वादानंतर दोन्ही खेळाडूंनी सोशल मीडियातून दिलेल्या काही प्रतिक्रियांनीही वातावरण तापते ठेवले. चाहत्यांनी तर नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. आता तर यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी उडी घेतल्याचे समोर आले आहे.

अलीकडेच नवीन उल हकने फळांचा राजा आंब्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या ग्रुप मॅचदरम्यान टीव्ही स्क्रीनसमोर एका काचेच्या भांड्यात आंबे ठेवून त्याचा फोटो शेअर केला होता. तो सामना आरसीबीने गमावला होता. आणि एकप्रकारे त्याचाच आनंद नवीनने साजरा केल्याचा अनेकांनी अंदाज लावला होता. (Virat Kohli vs Naveen Ul Haq)

नुकत्याच झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सला मुंबई इंडियन्सकडून 81 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. यासह एलएसजीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या सामन्यानंतर चाहत्यांनी लखनौचा गोलंदाज नवीनवर त्याच्या अंब्यांच्या पोस्टसाठी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यात मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी सहभागी होत अफगाणिस्तानच्या खेळाडूवर ट्रोलिंगचा फास आवळल्याचे समोर आले आहे. (Virat Kohli vs Naveen Ul Haq)

एलिमिनेटर सामन्यात नवीन-उल-हकने मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. नवीनने कर्णधार रोहित शर्मा, कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या विकेट्स घेतल्या. नवीनच्या या गोलंदाजीने मुंबई इंडियन्सला 200 चा आकडा गाठण्यापूर्वीच रोखले. मात्र, मुंबई इंडियन्सच्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संपूर्ण संघ 101 धावांत गारद झाला. या पराभवाने लखनौचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले.

एलएसजीच्या या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे तीन खेळाडू संदीप वॉरियर, विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय यांनी नवीनची खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. या तिघांनी राऊंड टेबलच्या मध्यभागी तीन आंबे ठेवले आहेत आणि तिघांनी गांधीजींच्या तीन माकडाप्रमाणे वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका अशी पोज देत फोटो शेअर केला आहे. त्यांचे हे फोटो पाहून चाहत्यांनी नवीनला धारेवर धरत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

लखनौने आंब्यालाच केले म्यूट

इतकेच नाही तर ‘आंबा’ हा शब्द ट्विटरवर इतका व्हायरल झाला की तो ट्रेंडमध्ये येऊ लागला. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊच्या पराभवानंतर खुद्द लखनौ सुपरजायंट्सने नवीनची चेष्टा केली आहे. एलएसजीला ‘मँगो’, ‘मँगोज’, ‘स्विट’ आणि ‘आम’ हे शब्द म्यूट करण्यास भाग पाडले आहे. असे केल्यावर चाहत्यांनी ही पोस्ट नवीनच्या आंबा पोस्टशी संबंधित असल्याचा अंदाज लावला. LSG ने पोस्टला कॅप्शन दिले – आमच्या हितासाठी रिलीज. यावरही सोशल मीडिया यूजर्सनी नवीनची खिल्ली उडवली आहे. जेव्हा कोणी एखादा शब्द म्यूट करतो, तेव्हा तो शब्द ट्विट केल्यावर त्यांना नोटीफिकेशन मिळत नाहीत. नवीनचा लखनौमधील पराभव व्हायरल होणे निश्चितच होते. अशा स्थितीत लखनौने आंबा हा शब्दच म्यूट केल्याने चर्चेला उधान आले आहे.

Back to top button