अहमदनगर : साहेब, सांगा कशी विझवायची आग ? अग्निशामक विभागात 17 कर्मचारी आणि अवघा एक बंब | पुढारी

अहमदनगर : साहेब, सांगा कशी विझवायची आग ? अग्निशामक विभागात 17 कर्मचारी आणि अवघा एक बंब

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : केडगाव औद्योगिक वसाहतीतील साईराज कंपनीला काल आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग वेळेत आटोक्यात न येण्यास महापालिकेची तोकडी यंत्रणा कारणीभूत ठरली. तत्काळ माहिती मिळूनही अग्निशामक विभाग बंबाद्वारे आग विझवू शकला नाही. कारण महापालिकेकडे जास्त क्षमतेचा बंबच शिल्लक नाही. दुसरीकडे कर्मचार्‍यांची वानवा. परिणामी टँकरद्वारे पाणी टाकून आग विझविण्याची नामुष्की महापालिकेवर आली. त्यामुळे आयुक्त साहेब, सांगा आग विझवायची कशी असा सवाल नगरकरांमधून उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या विदारक परिस्थितीबाबत दैनिक पुढारीने ‘एकाच अग्निशमन केंद्रावर नगर शहराची भिस्त’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिकेकडे तीन अग्निशमन केंद्रे आहेत. मात्र, केडगाव व सावेडी येथे अग्निशामक बंबच नाही. ही दोन्ही केंद्रे रिकामी आहेत. केवळ माळीवाडा केंद्रावर एकच बंब शिल्लक आहे. मात्र, त्याची क्षमता कमी असल्याने अडचणी येत आहेत. दुसरीकडे अग्निशामक विभागात केवळ 17 कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे साधन-संसाधने नाहीत, तर दुसरीकडे कर्मचार्‍यांची वानवा. त्यामुळे अग्निशामक विभाग समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. स्थायी समिती, सर्वसाधारण सभांमध्ये नगरसेवक त्यावर आवाज उठवितात. मात्र, प्रशासन त्याची दखल घेत नाही.

अग्निशामक विभागाला सध्या 70 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. मात्र, भरती प्रक्रिया होत नाही. त्यामुळे बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेण्याला मंजुरी दिली आहे. त्याही कर्मचार्‍यांची अद्याप नेमणूक नाही. मग, शहरात आग लागल्यास ती कोणी विझवायची, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच प्रत्यय काल केडगावमध्ये आला.

केडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये साईराज तेल कंपनीला आग लागली. अग्निशामक विभागात तत्काळ माहिती कळवूनही आग विझविण्यात अपयश आले. कारण मोठ्या क्षमतेचा बंब त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. जो बंब उपलब्ध होता, त्याची क्षमता कमी होती. परिणामी नागरिकांना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरद्वारे पाणी आणून आग विझविण्यात आली. राष्ट्रीय व राज्यस्तरावर पुरस्कार मिळविणार्‍या महापालिकेकडे आग विझविण्याची यंत्रणा सक्षम नसेल तर, नागरिकांनी काय बोध घ्यायचा, असा प्रश्न नगरकरांकडून विचारला गेला, तर महापालिकेकडे काय उत्तर असेल़?

अग्निशमन कर कशासाठी भरायचा?

महापालिकेच्या बजेटमध्ये या वर्षीपासून मालमत्ता धारकांकडून 5 टक्के अग्निशमन कर घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेकडे आग विझविण्याची यंत्रणाच नसेल, तर कर कशासाठी भरायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अग्निशामक विभागात चाळीस कर्मचारी भरण्यास आज आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिली असून, येत्या आठ दिवसांत भरती प्रक्रिया होईल. दरम्यान, महापालिकेचे दोन अग्निशामक बंब गॅरेजवर असले, तरी उपलब्ध बंबांची चांगली क्षमता आहे. काल त्याच बंबांच्या पंपाद्वारे हौदातील पाणी उपसून आग विझविण्यात आली.

                                                     – शंकर मिसाळ,
                                                 अग्निशामक विभागप्रमुख

बाह्य संस्थेमार्फत अग्निशमन विभागात तत्काळ कर्मचारी भरती करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, तर अग्निशामक बंब दुरुस्ती तत्काळ करून केडगाव व सावेडी केंद्रात उपलब्ध करण्यासंदर्भातही आदेश दिले आहेत. चार दिवसांत कार्यवाही न झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

                                                    – रोहिणी शेंडगे, महापौर

Back to top button