पुणे : स्वारगेट एसटी स्टँड की रिक्षा स्टँड? स्थानकावर मद्यपींचा अड्डा | पुढारी

पुणे : स्वारगेट एसटी स्टँड की रिक्षा स्टँड? स्थानकावर मद्यपींचा अड्डा

प्रसाद जगताप

पुणे : एसटीच्या स्वारगेट स्थानकाच्या आतमध्ये आणि प्रवेशद्वारावरच एसटीच्या गाड्यांसोबतच मोठ्या प्रमाणावर रिक्षा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एसटीच्या गाड्या बाहेर काढताना आणि प्रवाशांना ये-जा करताना मोठा अडथळा होत असून, स्वारगेट स्थानक एसटी स्टँड आहे की रिक्षा स्टँड? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्वारगेट एसटी स्थानक येथून दररोज हजारोंच्या संख्येने राज्यभर आणि राज्याबाहेरही नागरिक प्रवास करतात. त्यांना प्रशस्त सुविधा पुरविणे सोडाच, एसटी अधिकारी येथे येणार्‍या समस्या सोडविण्याकडे देखील लक्ष देत नाहीत. दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने सोमवारी पुण्यातील एसटी स्थानकांची पाहणी केली. स्वारगेट स्थानकात समस्यांचा अक्षरश: डोंगरच पाहायला मिळाला. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नाहीत. त्यामुळे इतर वाहनचालक सर्रास स्थानकात प्रवेश करून कोंडी करीत आहेत.

स्थानकाचे एका पावसात होते तळे

स्वारगेट स्थानकातील चेंबर आणि सांडपाणी वाहिनीची अवस्था खराब आहे. अवकाळी पावसाच्या एका तडाख्यातच स्थानकाचे तळे होते.

इमारतीची दुरवस्था

स्वारगेट स्थानकाच्या मुख्य इमारतीची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. छताच्या स्लॅबचे ठिकठिकाणी पोपडे निघाले आहेत. तर पाणी मुरून या स्थानकाच्या भिंतींना बुरशी आली आहे. स्लॅबचे तुकडे पडून काही प्रवासी जखमी झाल्याची नुकतीच घटना घडली आहे.

सगळीकडे कचरा

स्वारगेट एसटी स्थानकाच्या सोलापूरला लागणार्‍या गाड्यांच्या समोरील बाजूस नवीन प्लॅटफॉर्म बनविण्यात आला आहे. त्या ठिकाणी असलेल्या कोपर्‍यामध्ये मोठे कचर्‍याचे ढीग आहेत. तसेच, स्वच्छतागृह अस्वच्छ आहे.

प्लॅटफॉर्म दारुड्यांचे घर

सोलापूर गाड्यांच्या दिशेला नव्याने उभारण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मचा एसटी प्रशासनाकडून अजिबात वापर करण्यात येत नाही. त्यामुळे येथे मद्यपींनी घर केले आहे. इतके पैसे खर्च करून नवा बनविलेला प्लॅटफॉर्म दारुड्यांसाठी उभारला का? असा सवाल प्रवाशांतून केला जात आहे.

Back to top button