सोलापूर : तीन लाखांसाठी जन्मदात्यांनीच पोटच्या गोळ्याला विकले! | पुढारी

सोलापूर : तीन लाखांसाठी जन्मदात्यांनीच पोटच्या गोळ्याला विकले!

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : 18 दिवसांच्या बाळाला 3 लाखांना विकणार्‍या आई-वडिलांसह 10 जणांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सुरू असून, अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही, असे सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

30 एप्रिल रोजी पूजा (टोपन नाव) हिने एका मुलास जन्म दिला. ते बाळ आजारी असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत होते. त्यावेळी ओळखीतील संशयित महिलेने बाळाच्या आईला, तुला तीन मुले आहेत. शिवाय, तुझा नवरा दारूडा आहे. या बाळाला कसे सांभाळणार, माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत. ते या बाळावर मोफत उपचार करतील, असे सांगितले. त्यानंतर पूजाला मरिआई चौकात बोलावून बाळाची मागणी केली. मात्र, पूजाने बाळाला दिले नाही. त्यानंतर 1 मे रोजी सकाळी आईला बाळासह जिल्हा परिषदेजवळ येण्यास सांगितले. त्यावेळी त्या महिलेने व तिच्या साथीदारांनी बाळ दत्तक देत असल्याचा बाँड करून त्यावर सही घेतली; पण बाळ कोणाला देत आहे याचा उल्लेख त्या नव्हता, असे त्या बाळाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेचा पोलिसांनी उलटतपास केला असता आईनेच बाळाला 3 लाखांना विकल्याचा प्रकार समोर आला. याशिवाय एका मध्यस्थी महिलेने 80 हजार रुपये काढून घेत बाळाच्या आईला 2 लाख 20 हजार रुपये दिल्याचे निष्पन्न झाले.

Back to top button