15 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त! | पुढारी

15 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त!

तिरुअनंतपुरम; वृत्तसंस्था :  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तसेच भारतीय नौदलाने एका संयुक्त कारवाईअंतर्गत भारतीय सागरी हद्दीतून सुमारे 15 हजार कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज (2600 किलो) जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे मूळ पाकिस्तान असून, ते इराणच्या चाबहार बंदरातून आणण्यात आलेले होते. केरळच्या कोची किनारपट्टीलगत ही कारवाई झाली.

समुद्रात एके ठिकाणी ड्रग्जचे मुख्य जहाज (मदरशिप) थांबलेले होते. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या छोट्या बोटी या जहाजापर्यंत जात व आपापल्या वाट्याचे ड्रग्ज बोटीतून आपापल्या देशात नेत होत्या. ड्रग्जची ही खेप श्रीलंका, मालदीव व भारतासाठी आलेली होती. कारवाईत एका पाकिस्तानी ड्रग्ज माफियाला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या पोत्यांवर 555 व सुगंध असे लिहिलेले होते.

ऑपरेशन समुद्रगुप्त

फेब्रुवारी 2022 मध्ये एनसीबीने ऑपरेशन समुद्रगुप्त सुरू केले. याअंतर्गत आतापर्यंत अनेक कारवाया एनसीबीने केल्या आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये पहिल्यांदा गुजरातच्या किनारपट्टीवरून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज हेरॉईन जप्त केले होते.
ऑक्टोबर 2022 मध्ये संयुक्त पथकाने केरळ किनारपट्टीवर एक इराणी बोट रोखली आणि 200 किलो हेरॉईन जप्त केले होते.

मदरशिप म्हणजे काय?

मदरशिप हे एक मोठे जहाज असते. ते विविध देशांतून माल खरेदीला आलेल्या लहानसहान बोटींना ड्रग्जचा पुरवठा करते.

किंमत हा निकष मानला तर ड्रग्जची खेप जप्त होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
– संजय कुमार सिंह, उपमहासंचालक, एनसीबी

Back to top button