दिव्यांगांची पदोन्नती रखडली; आरोग्य विभागातील सेवाज्येष्ठता यादीत सावळागोंधळ | पुढारी

दिव्यांगांची पदोन्नती रखडली; आरोग्य विभागातील सेवाज्येष्ठता यादीत सावळागोंधळ

दत्ता नलावडे

खडकवासला(पुणे) : सेवाज्येष्ठता यादीच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील दिव्यांग कर्मचार्‍यांची पदोन्नती रखडली आहे. जिल्ह्यातील विविध जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर आरोग्य विभागातील 16 दिव्यांग कर्मचारी या यादीच्या गोंधळामुळे पदोन्नतीपासून वंचित असल्याचे चित्र पुढे आले आहे.

आरोग्य विभागात पर्यवेक्षक व आरोग्य सहायक या पदांवर काम करत असलेल्या दिव्यांग कर्मचार्‍यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे आरोग्य विस्तार अधिकारीपदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. या पदांवर प्रथमच दिव्यांगांना पदोन्नती देण्यात येत आहे. पात्र कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष पदोन्नतीचे पद मिळाले नाही; मात्र ती वेतनश्रेणी मिळत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या जानेवारी 2022 च्या पदोन्नती यादीला हरकत घेतली होती. याबाबत पुणे जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे दिलीप जगताप व दिव्यांग कर्मचार्‍यांनी लेखी तक्रार केली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली असून, प्रस्तावित पदोन्नती यादीला आक्षेप घेतलेल्या दिव्यांग कर्मचार्‍यांची सुनावणी घेऊन अंतिम पदोन्नती यादी जाहीर करण्यात येणार आहे तसेच रिक्त जागांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येणार आहे.

पदोन्नतीसाठी दिव्यांगांच्या आरक्षित पदाच्या बिंदूनामावलीत सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येते. दिव्यांग आरोग्य कर्मचार्‍यांना पर्यवेक्षक व आरोग्य सहायक पदांवर पदोन्नती देताना अडचणी निर्माण झाल्या नाहीत. मात्र, पर्यवेक्षक व आरोग्य सहायक दिव्यांग कर्मचार्‍यांना आरोग्य विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात अडचणी उभ्या राहिल्या असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. जिल्ह्यात 19 आरोग्य विस्तार अधिकारी पदे आहेत. त्यातील 8 पदे 31 मेपर्यंत रिक्त होणार आहेत. दिव्यांगांसाठी 4 टक्के आरक्षण आहे. राज्य सरकारने काढलेल्या नवीन आदेशानुसार दिव्यांगांच्या पदोन्नतीसाठी प्रकिया राबविण्यात येणार आहे.

काही कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर

खानापूर (ता. हवेली) येथील आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका रंजना नलावडे, पुण्यातील आरोग्य सहायक शिवाजी कोंथिबीरे आदी दिव्यांग कर्मचारी पदोन्नतीसाठी प्रतक्षक्षा करत आहेत. यातील अनेक कर्मचारी वर्षभरात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष पदोन्नतीविना निवृत्त व्हावे लागणार आहे.

दिव्यांग कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. याला आक्षेप घेतलेल्या कर्मचार्‍यांची सुनावणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या चार आठवड्यांत सर्व कार्यवाही पूर्ण होऊन दिव्यांग कर्मचार्‍यांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या कर्मचार्‍यांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रत्यक्ष पदोन्नती देण्यात येणार आहे.

                                               डॉ. विजयकुमार वाघ,
                               अतिरिक्त आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

 

Back to top button