बेळगावात पाणीटंचाई ! मे अखेरपर्यंतच पुरणार पाणी | पुढारी

बेळगावात पाणीटंचाई ! मे अखेरपर्यंतच पुरणार पाणी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  शहरात फेब्रुवारीपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात घट झाली असून, मेअखेरपर्यंत पाणीपुरवठा पुरणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाने दिली आहे. त्यामुळे शहरात 8 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत 14 फुटाने पाणीसाठा घटला आहे. पावसाने हजेरी लावली नाही तर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

शहर, उपनगरात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यंदा कूपनलिका व विहिरीदेखील कोरड्या पडू लागल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहराची लोकसंखा 6 लाखांच्या आसपास असून 58 वॉर्डात मिळून अधिकृत नळजोडण्या 72 हजार आहेत. त्यांना एलअ‍ॅण्डटी कंपनीकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, अशी ग्राहकांची तक्रार आहे.

एप्रिल महिन्यात वळीव पाऊस होतात. मात्र यंदा वळीव पावसानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राकसकोप जलाशयातील पाणीसाठा प्रत्येक महिन्याला पाच फुटाने कमी होत चालला आहे.
सध्या राकसकोत जलाशयात 2452 फूट पाणीसाठा शिल्लक आहे. फेब्रुवारी महिन्यात हा पाणीसाठी 2465 फूट इतका होता. 14 फुटाने पाणीसाठा कमी झाला आहे. जेमतेम मे महिना अखेरपर्यंत पाणीसाठा पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाने एलअ‍ॅण्डटी कंपनीला दिली आहे. त्यामुळे भविष्यात 15 दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

तलावातील गाळ काढा

राकसकोप जलाशयातील गाळ काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. बेळगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपनगरेदेखील वाढली आहेत. त्यामुळे पाणीसाठा वाढवण्यासाठी तलावातील गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणीसाठा वाढून उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट जाणवणार नाही.

24 तास वॉर्डात पाणी नाही

58 पैकी 10 वॉर्डांत 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र पाणीटंचाईमुळे 24 तास वॉर्डातदेखील पाणीपुरवठ्याचे गणित कोलमडले आहे. या भागातदेखील आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

Back to top button