Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक | पुढारी

Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

दिवसा रिक्षा चालवून बंद घराची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सिडको व गंगापूर भागातील १० घरफोड्यांतील सुमारे वीस लाख ८९ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व स्विफ्ट कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले आदी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाढलेल्या घरफोड्यांबाबत तपास करीत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, धुळे येथून काही इसम रात्री कारने नाशकात येऊन घरफोडी करतात.

नाशिक शहरात राहणारा संशयित हेमंत ऊर्फ सोन्या किरण मराठे (२८, रा. पेठ रोड, शनी मंदिर, नवनाथनगर, पंचवटी, नाशिक, मूळ रा. हॉटेल डीडीआरसीचे पाठीमागे, श्रीराम ट्रान्स्पोर्ट नगर, धुळे) हा युवक रिक्षा चालवित विविध परिसरांमध्ये रेकी करून बंद घरांची माहिती गोळा करतो. ती माहिती धुळे येथील संशयित सौउद अहमद मोहमद सलीम अन्सारी (२१, शादाब नगर, धुळे) यास देतो, असे समजले. या माहितीवरून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, हवालदार पवन परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, दीपक शिंदे, समाधान शिंदे, प्रवीण राठोड, अनिल ढेरंगे, राकेश राऊत, संदीप भुरे, सागर जाधव, जनार्दन ढाकणे, घनश्याम भोये, अनिल गाढवे यांनी सापळा रचला. त्यानुसार दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्यात दाखवित सगळी माहिती घेतली. त्यानंतर धुळे येथे जात त्यांचे इतर साथीदार शाकीर ऊर्फ पप्पू बम इब्राहिम शहा (३२, रा. रूम नं. ८४१, आझादनगर, भोईवाडा, वडजाई रोड, धुळे), तौसिफ ऊर्फ मामू अजिज शहा, (३०, रा. अंबिकानगर, इब्राहिम मस्जिद शंभर फुटी रोड जवळ, धुळे), समीर सलीम शहा (२३, जयशंकर कॉलनी कबीर मंदिराजवळ, चाळीसगाव रोड, धुळे), इस्माईल ऊर्फ मारी अहमद शेख (२०, रा. रूम नं. ०२, आझादनगर, वडजाईनगर, मारुती मंदिराजवळ, धुळे), वसिम झहिरूद्दीन शेख, (३२ रा. बोरसे कॉलनी, वडजाई रोड, मुगनी मस्जीदजवळ धुळे) यांना सापळा रचून ताब्यात घेतले.

दहा घरफोड्या केल्याची कबुली 

नाशिकमध्ये केलेल्या घरफोडी व चोरीसंदर्भात त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी शहरामध्ये गंगापूर भागात एक व अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नऊ अशा दहा घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून स्विफ्ट कार व वीस लाख ८९ हजार रुपयांचे दागिने, टीव्ही जप्त केला आहे. त्यांच्याकडून इतरही घरफोडींची माहिती मिळण्याची शक्यता आहे. चोरीतील दागिने खरेदी करणाऱ्या धुळे येथील दोन सोनारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले व पोलिस शिपाई अनिल ढेरंगे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button