पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार का ? | पुढारी

पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार का ?

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : पुणे शहराला 15 ऑगस्टपर्यंत आवश्यक असलेले पिण्याचे पाणी, शेतीला उन्हाळी आवर्तनासाठी गरजेचे पाणी यांची एकत्रित मागणी पुरी पडण्याएवढा पाणीसाठा खडकवासला धरणसाखळीत आज उपलब्ध आहे. असे असताना संभाव्य पाणीकपातीसाठी पुढील महिन्यात पुन्हा आढावा घेण्याची घोषणा का करण्यात आली, हे कोडे जाणकारांना पडले आहे. संभाव्य पाणीकपातीची टांगती तलवार का? हा प्रश्न पुणेकरांसमोर आहे. धरणसाखळीतील पाणीसाठा लक्षात घेत त्याचे नियोजन 15 ऑक्टोबरला केले जाते.

या वेळी संभाव्य अल निनोच्या परिणामामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता गृहीत धरत ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी साठविण्याची सूचना राज्य सरकारने केली. त्यामुळे पुणे महापालिकेने जादा पाण्याची मागणी नोंदविली. जलसंपदा विभागाने मात्र दरवर्षीप्रमाणे 15 जुलैपर्यंत पाणी आरक्षित ठेवले. त्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बुधवारी चर्चा झाली. सिंचनासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू करण्याचे ठरले. तर, पाणीकपातीबाबत चर्चा न करता, त्याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेण्याचे ठरले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी सांगितल्यानुसार, खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांच्या पाणीसाठ्यातून महापालिका दरमहा दीड अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी घेते. त्यामुळे, पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे जुलैअखेरपर्यंत त्यांना साडेचार टीएमसी पाणी लागेल. सर्वांना पाणी दिल्यानंतरही 15 जुलै रोजी अर्धा टीएमसी पाणी धरणांत शिल्लक राहणार असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

ते पाणी दहा दिवस म्हणजे दहा ऑगस्टपर्यंत पुरेल. बाष्पीभवन व वहनव्ययासाठी जलसंपदा विभागाने जादा पाणी दाखविल्यासारखे दिसून येते. मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी पाणी घेतल्यास, धरणांतून घेण्यात येणारे पाणी वाचणार आहे. हे सर्व लक्षात घेतल्यास, पुणे शहराला 15 ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल, एवढा साठा धरणात शिल्लक आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

महापालिकेने केली होती पाण्याची मागणी

महापालिकेने जुलै 2021 ते जून 2022 दरम्यान 20.79 टीएमसी पाणी वापरले. त्यापैकी खडकवासल्यातून 18.42 टीएमसी पाणी घेतले. खडकवासला धरण साखळीतून जुलै 2022 पासून मार्च 2023 पर्यंत महापालिकेने 13.97 टीएमसी पाणी घेतले. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांसाठी महापालिकेने 8.87 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. सध्या पुरेसे पाणी धरणांत उपलब्ध आहे. मात्र तरीही पाणीटंचाई भासल्यास, पाणीकपातीचे नियोजन करू, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्याचे बंधन आहे. त्यानुसार पुण्यासाठी 4.53 टीएमसी पाणी आरक्षित ठेवले आहे. महापालिकेला ते पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखून ठेवायचे असल्यास, महापालिकेने त्यांच्यासाठी आरक्षित केलेल्या पाणीसाठ्यातून वापराचे नियोजन करावे. उभ्या पिकाच्या सिंचनासाठी उन्हाळी दुसरे आवर्तन देण्याचे बैठकीत ठरले.

            – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग.

Back to top button