आता हवामान विभाग जाहीर करणार हीट इंडेक्स; खारघर येथील घटनेमुळे निर्णय | पुढारी

आता हवामान विभाग जाहीर करणार हीट इंडेक्स; खारघर येथील घटनेमुळे निर्णय

आशिष देशमुख

पुणे : नवी मुंबई येथील खारघर येथे केवळ तापमान जास्त नव्हते तर आर्द्रताही सुमारे 80 टक्के होती. त्यामुळे तेथील हीट इंडेक्स वाढल्याने लोकांना उष्माघाताचा त्रास झाला, ही बाब गांभिर्याने घेत हवामान विभाग आता देशभरातील सर्वच ठिकणाचा हीट इंडेक्स जाहीर करणार आहे. खारघर येथील घटनेनंतर या विषयावर संशोधन सुरू झाले. केवळ तापमान कारणीभूत आहे का यावर संशोधन सुरू झाले. काही हवामान शास्त्रज्ञांनी आपले अभ्यासपूर्ण मत यावर नोंदवले.

पुणे येथील ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार खारघर येथे केवळ तापमान हा घटक कारणीभूत नव्हता तर तापमान आणि आर्द्रतेचा अतिरेक कारणीभूत होता, त्याला हीट इंडेक्स (एच.आय.) असे म्हणतात. तो स्कूल डॉट नेट या सा ई टवर बघता येतो. येथे जगभराचा हीट इंडेक्स दिसतो.

खारघरचा हीट इंडेक्स होता 55

डॉ. कुलकर्णी यांच्या अभ्यासानुसार त्या दिवशी खारघरचा हीट इंडेक्स हा 55 होता. तो घातक प्रकारात मोडतो. शहराचे तापमान 35 होते, मात्र आर्द्रता तब्बल 80 टक्के होती. त्यामुळे घाम आला तरी तो सुकत नव्हता. त्यामुळे शरीरही थंड होत नव्हते, ते फक्त गरम होते गेले. शरीराचे तापमान 37 अंश असते.

त्यावर गेले की घाम येऊन शरीर थंड करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र हे तापमान 45 अंशांवर गेले की, मात्र थंरीर थंड करणारी यंत्रणा हतबल होते. शरीराचे (मेंदूचे) कामकाजच बंद पडते. मेंदूतील न्यूरॉन्सची क्रिया पूर्ण थांबून पुढे हृदय व श्वासोच्छवास बंद पडतो आणि मृत्यू होतो.

प्रतिकार शक्ती कमी असणार्‍यांना त्रास..

खारघर येथे हीट इंडेक्स जास्त होता. मात्र, तेथे हजर प्रत्येकाला हा त्रास झाला नाही कारण प्रत्येकाची त्या वेळी असलेल्या प्रतिकार शक्तीवर ती सहनशक्ती अवलंबून असते. ज्याची प्रतिकार शक्ती कमी पडली त्यांना त्रास झाला, असा दावा डॉ. कुलकर्णी यांनी केला आहे.

हीट इंडेक्स हा प्रकार काय असतो, हे सामान्यांना माहिती नाही. तापमान आणि आर्द्रता यांचे गुणोत्तर म्हणजे उष्णतेचा घातांक, त्यालाच हीट इंडेक्स म्हणतात. तो जाहीर केला पाहिजे, म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमांना जाताना लोक सावध राहतील. याबाबत मी स्वत: पुणे व मुंबईत कार्यशाळा घेऊन लोकजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे.

      – डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग, पुणे.

उन्हाळ्यात लोकांनी खरोखर काळजी घेण्याची गरज आहे. तापमान वाढले की आपण सावली शोधतो. आपले शरीरच आपल्याला सिग्नल देते. या सर्व बाबी लक्षात घेऊन लोकांनी उच्च तापमानात जाताना सावध असले पाहिजे. खारघर येथील घटनेपासून बोध घेऊन आम्ही हीट इंडेक्स जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

      – डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, भारतीय हवामान विभाग, दिल्ली.

Back to top button