नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
‘तू आमच्याकडे रागाने का पाहतो’, असे विचारत मागील भांडणाची कुरापत काढून दोन जणांना कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना उपेंद्रनगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहा संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेतील एक संशयित विजय तायडे यास पोलिसांनी अटक केली असून, इतर संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
मंगळवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास संदीप घुसळे (३२, रा. उपेंद्रनगर) व त्याचा मित्र अथर्व बेलेकर (रा. उपेंद्रनगर) हे येथील एका किराणा दुकानाजवळ गप्पा मारत उभे होते. याचदरम्यान या ठिकाणाहून संशयित आरोपी नागेश सोनवणे, विजय तायडे, राहुल त्रिभुवन, संदीप डोळस, असिफ शेख, गायकवाड हे जात होते. यावेळी त्यांनी अथर्व बेलेकर यांना ‘तुम्ही आमच्याकडे काय पाहत आहे’ असे विचारत जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या संदीप घुसळे यालाही संशयित आरोपींनी कोयता, लाकडी दांडका तसेच चाकूसारख्या धारदार शास्त्राने वार करत गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सहा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.