दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीत आलेले पाणी आठ दिवसातच संपल्याने पुन्हा दूध गंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गेल्या दोन दिवसापासून नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारे व शेतीसाठी पाणीपुरवठा करणारे दोन्ही जॅकवेल बंद पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. तर फेब्रुवारी व मार्च पासून पाचव्यांदा दूधगंगा नदी कोरडी पडली आहे. याचा परिणाम शेतीतील पिकावर होत आहे. ऊस पिकाची वाढ खुंटली आहे तर भाजीपाला व इतर पिकांची अवस्था दयनीय होत चालली आहे. सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. काळमवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर ठीक ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटकातील गावात पाणी अडवले जाते. त्यामुळे फार कमी प्रमाणात या नदीवरील शेवटच्या गावात पाणी येते. आलेले पाणी मोठ्या प्रमाणात उपसा होऊन बघता बघता संपत्त आहे. शिवाय पाणी अडवण्यासाठी ठोस उपाय योजना नसल्याने उपसा न झालेले पाणी कर्नाटकात निघून जाते. नदीपात्रातील पाणी संपल्याने नागरिकांना बोर, कुपनलिका, विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महिला, पुरुष, लहान मुले सर्वांनाच कसरत करावी लागत आहे. तर पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. पाटबंधारे खात्याने याची गंभीर दखल घेऊन दूधगंगा नदी पात्रात किमान मे महिन्याअखेरपर्यंत वरचेवर पाणी सोडत राहावे, अशी मागणी होत आहे.
दूधगंगा नदीपात्रात पाणी संपल्याचा सर्वाधिक फटका दतवाड, टाकळीवाडी, घोसरवाड गावांना बसत आहे. त्यामुळे दत्तवाड ग्रामपंचायतीने नदीपात्रात पाणी आल्यानंतर ते अधिक काळ टिकून राहावे, यासाठी ठीक ठिकाणी बांध घालून अथवा इतर माध्यमातून पाणी अडवण्यासाठी उपाययोजना कराव्यां अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक गावात पाणी अडवले जाते. ते ओव्हर फ्लो होऊनच इतर गावात जाते. त्यामुळे पाटबंधारे खात्याने याची दखल घ्यावी व ठीक ठिकाणी पाणी अडवणे थांबवावे व दूधगंगा नदीवरील शेवटचे गाव दत्तवाड येथे हे पाणी अडवण्यासाठी भक्कम तटबंदी करावी. यामुळे सर्वांनाच नदीपात्रातील पाण्याचा लाभ घेता येईल.
हेही वाचा :