सांगली : कुपवाड येथे कौटुंबिक वादातून डॉक्‍टर भावाचा गळा चिरून खून | पुढारी

सांगली : कुपवाड येथे कौटुंबिक वादातून डॉक्‍टर भावाचा गळा चिरून खून

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा :  कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा विळ्याने  गळा चिरून खून केल्याची धक्कादाक घटना कुपवाड येथे आज (दि.२६) भरदिवसा घडली. डॉ. अनिल बाबाजी शिंदे (वय ४३, रा.कुपवाड, जि.सांगली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संपत बाबाजी शिंदे (वय ३५, रा.कुपवाड जि.सांगली) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कुपवाड – मिरज रस्त्यालगत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या खोलीत अनिल शिंदे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शिंदे घरात ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. त्यावेळी हातात धारदार विळा घेऊन आलेल्या संशयित संपत शिंदे याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. ‘अन्या कुठे आहे, असे म्हणत ज्ञानेश्वरी वाचत बसलेल्या अनिल शिंदे यांच्या गळ्यावर धारदार विळ्याने हल्ला केला. सात ते आठ वर्मी घाव बसल्याने शिंदे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले.  शिंदे यांच्या घाबरलेल्या पत्नीने मुलांना घेऊन खोली बाहेर पडत  आरडाओरडा केला. संशयित संपत ‍पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर संपत शिंदे याला जेरबंद करण्यात आले. अनिल शिंदे यांचा कुपवाड एमआयडीसी मुख्य रस्त्यालगत आधार क्लिनिक या नावाने दवाखाना आहे. पत्नी सरस्वती या जिल्हा मध्यवर्ती बॅकेत नोकरी करते.

हेही वाचा :

Back to top button