वारजेमधील रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन सील; काय आहे कारण? | पुढारी

वारजेमधील रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन सील; काय आहे कारण?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजे माळवाडी येथील एका खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सील करण्यात आली. आरोग्य उपप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई केली. संबंधित रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या भरारी वैद्यकीय पथकातर्फे धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तपासणी केली असता संबंधित रुग्णालयाने मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये 53 ’फॉर्म एफ’वर रुग्णांच्या सह्या घेतल्या नसल्याने आढळून आले. सध्या खासगी रुग्णालयाला मशीन सील करून 15 दिवसांची नोटीस देण्यात आली. या कालावधीत त्रुटी दूर न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गर्भधारणापूर्व तपासणी तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत शहरातील सोनाग्राफी सेंटर, गर्भपात केंद्रांची काटेकोर तपासणी करण्यात येते. गर्भपात केंद्राची तपासणी करताना सर्व नोंदी बारकाईने तपासल्या जातात. त्रुटी आढळल्यास शहानिशा केली जाते. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पोलिसांकडे तक्रार नोंदवू शकतात. सरकारमान्य आणि नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरची दर तीन महिन्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाते. त्यासाठी 15-20 जणांची टीम कार्यरत आहे. पाहणीमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित केंद्रांना नोटीस पाठवली जाते. नोटिशीला उत्तर न आल्यास किंवा त्रुटी दूर न केल्यास केंद्र सील केले जाते. गर्भलिंग निदान होऊ नये आणि होत असल्यास त्यावर कारवाई व्हावी, यासाठीही यंत्रणा कार्यरत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

काय आहे फॉर्म एफ?

पीसीपीएनडीटी कायद्यानुसार, रुग्णांच्या नोंदी ठेवण्यासाठी फॉर्म एफ भरून घेणे अनिवार्य आहे. या फॉर्ममध्ये रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक, रुग्णाची मूलभूत माहिती, आधीची अपत्ये – किती मुले, किती मुली, उपचार करणा-या डॉक्टरांची माहिती, उपचारांची आणि तपासण्यांची माहिती, वैद्यकीय पार्श्वभूमी आदींची इत्थंभूत माहिती भरून रुग्णांची सही घ्यावी लागते. वारजेमधील खासगी रुग्णालयाने तब्बल 53 अर्जांवर रुग्णांच्या सह्या घेतल्या नसल्याचे आढळून आले.

हेही वाचा

Back to top button