सांगली : एचआयव्हीबाधितेच्या प्रसूतीला नकार; दोषींवर कारवाई | पुढारी

सांगली : एचआयव्हीबाधितेच्या प्रसूतीला नकार; दोषींवर कारवाई

देवराष्ट्रे; पुढारी वृत्तसेवा :  चिंचणी (ता. कडेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयात एचआयव्ही बाधितेची प्रसूती करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन तासानंतर महिलेला कराड येथील रुग्णालयात केले नव्हते. नेल्यानंतर तिने रुग्णालयाबाहेर मुलीला जन्म दिला.

याबाबत संबंधित रुग्णाच्या पतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करू, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले आहे.

महिलेच्या पतीने तक्रारीत म्हटले आहे की, पत्नीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने तिला चिंचणी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरच नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयातील परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी करून डॉक्टरांना बोलावून घेतले. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर रुग्णालयात आले. तोपर्यंत प्रसूतीच्या वेदनांनी असह्य झालेल्या पत्नीवर कोणतेही उपचार केले नव्हते. पत्नीची तपासणी केल्यानंतर ती एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉक्टरांनी तिची प्रसूती करण्यास नकार दिला. डॉक्टरांना सर्व अहवाल दाखविले. मात्र त्यांनी काहीही ऐकून न घेता पुढील उपचाराकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावून घ्या व कराड येथील रुग्णालयात जावा, असा सल्ला दिला. त्यानंतर रात्री कराड येथील रुग्णालयात पोहोचलो. पत्नीची रुग्णालयाबाहेरच प्रसूती झाली. तेथील डॉक्टरांनी पत्नी व मुलगीची तपासणी करून दोघीही सुखरूप असल्याचे सांगितले.

Back to top button