बिबट्याचा हल्ला नव्हे, कुर्‍हाडेंचा खूनच ! | पुढारी

बिबट्याचा हल्ला नव्हे, कुर्‍हाडेंचा खूनच !

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावच्या वडदरा येथे शनिवार (दि. 22 एप्रिल) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास 63 वर्षीय उत्तम बाळाजी कुर्‍हाडे यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार करीत त्यांचा पडवीत खून झाल्याचे उत्तरीय तपासणीसह पोलिस तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, घारगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वडदरा परिसरात उत्तम कुर्‍हाडे यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पो. नि. संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांनी कसून तपास केला आहे, परंतु भक्कम पुरावा अद्यापि हाती न लागल्याने खुन्यापर्यंत पोहचण्यास तपास यंत्रणांना यश आले नाही. शनिवारी रात्री 8 वाजता उत्तम कुर्‍हाडे टीव्ही पाहत असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला. हात, छाती व पाठीवर धारदार शस्रांचा जोरदार प्रहार झाला. हृदय व फुफ्फुसाला गंभीर जखम होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. प्रथमदर्शनी बिबट्याने हल्ला केल्याने उत्तम कुर्‍हाडे यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती.

पो. नि. संतोष खेडकर, पो. हे. कॉ. गणेश लोंढे, प्रमोद चव्हाण, राजेंद्र लांघे या घटनेचा कसून तपास करीत आहेत. या घटनेचे नक्की कारण समजल्याने नागरिकांनी पोलिस तपासबद्दल समाधान व्यक्त केले.

बोटा सोसायटीतून कर्ज घेतलेली रक्कम कोठे..?

उत्तम कुर्‍हाडे बोटा सोसायटीचे ते नियमित कर्जदार होते. मार्चअखेर त्यांनी कर्जाचा नियमित भरणा केला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा या सोसायटीचे कर्ज घेतले होते. मिळालेले कर्जाचा धनादेश खात्यात वर्ग केला की, रोकड घेऊन ते घरी गेले? पैशासाठी त्यांचा घातपात झाला की काय? या दिशेने तपास सुरू आहे.

बिबट्याच्या हल्ल्याची अफवा का पसरविली?
मृत उत्तम कुर्‍हाडे यांची आई जीवाच्या आकांताने ओरडत होती. तेव्हा प्रथम दर्शनी नागरिक तेथे आले असता, नेमकं काय घडलं, असा संभ्रम निर्माण झाला होता, परंतु बिबट्याने हल्ला केला ही अफवा कोणी व का पसरविली हा यक्ष प्रश्न अनुत्तरीत आहे.

Back to top button