बेदरकार चालकांना चाप कोण लावणार? रॅश ड्रायव्हिंगने वाढताहेत अपघात | पुढारी

बेदरकार चालकांना चाप कोण लावणार? रॅश ड्रायव्हिंगने वाढताहेत अपघात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी बसचालकांकडून बस गाड्या अतिवेगाने पळविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील किरकोळ अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रस्त्यावरील दुचाकी आणि चारचाकीचालकांसोबतच्या शाब्दिक चकमकींची तर मोजदादच राहिलेली नाही. हे रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

पीएमपीच्या ताफ्यात 2089 बस गाड्या आहेत. त्यापैकी 1600 ते 1700 बस दररोज मार्गावर असतात. शहरातील वाहतुकीतून मार्ग काढताना बसचालकांचे इतर वाहनचालकांसोबतचे वाद आणि किरकोळ अपघात हे रोजचेच ठरलेले आहे. मोठ्या अपघातांच्या घटनादेखील होत आहेत. या सर्व घटना बेशिस्त बसचालकांमुळे होत आहेत. हे बसचालक अतिवेगाने बस चालवण्यासोबतच आजूबाजूच्या इतर वाहनांचे भान ठेवत नाहीत. वाहतूक नियमांची ऐशी-तैशी करतात. त्यामुळे वाद, किरकोळ अपघात आणि शाब्दिक चकमकी, बसचालक-वाहकांच्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पीएमपी प्रशासनाने चालकांना प्रशिक्षणासोबतच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.

  •  पीएमपीला आत्तापर्यंत आलेल्या तक्रारी – 47,362
  •  निराकरण केलेल्या तक्रारी – 47,221
  •  प्रगतिपथावर असलेल्या तक्रारी – 120

इतर चालकांनाही नियम लावा

पुण्यातील वाहतूक कोंडीतून एवढी मोठी बस चालवणे, म्हणजे आम्हाला मोठी कसरत करावी लागते. त्यातच कधीतरी इतर वाहनचालकांना थोडासा धक्का लागला, तर ते आम्हाला मारायला उठतात. त्यामुळे इतर वाहनचालकांनासुद्धा वाहतुकीचे नियम लावावेत. आमच्यातील काही चालक बेशिस्तपणे गाडी चालवतात. त्यांच्यावर कडक कारवाई केली जात असते. मात्र, आमच्यातील चालकांनीसुद्धा इतर वाहनचालकांची काळजी घेत बस चालवायला हवी, असे दै. ‘पुढारी’शी बोलताना एका चालकाने सांगितले.

चालकांच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार आल्यास आम्ही तत्काळ दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई करतो. तसेच, चालकांनी बस चालवताना वेगावर नियंत्रण ठेवून इतर वाहनचालकांना आणि पादचार्‍यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

पीएमपीचे अनेक चालक बेशिस्तपणे गाडी चालवतात. कोंडीत तर ते इतर वाहनांची अजिबात पर्वाच करत नाहीत. बसचा धक्का लागला, तर आमच्या वाहनांचे नुकसान आणि आमच्या जिवाला मोठा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. बसचालक याउलट अपघात झाल्यावर विचारपूस करण्याऐवजी आमच्याशीच वाद घालतात आणि आम्हाला पोलिस चौकीला नेऊन ’सरकारी कामात अडथळा’ आणल्यावरून गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. बसचालकांकडून अनेकदा कायद्याचा दुरुपयोग होतो.

– रमेश खरात, बस प्रवासी.

 

हेही वाचा

Back to top button