नगरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी ! | पुढारी

नगरमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी !

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद काल (शनिवारी) श्रीरामपुरसह, राहुरी, राहाता, कोपरगाव संगमनेर व अकोले तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. ईदनिमित्त ईदगाह मैदान व जामा मशीद आदी मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छांचा जणू पाऊस पडल्याचे चित्र दिसले.

श्रीरामपुरमध्ये ईदगाह मैदानामध्ये दुवा करताना शहर काझी मौलाना अकबर अली म्हणाले, प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी या भूमिला उद्देशून गौरोद्गार काढले होते की, ‘मुझे जमीन ए हिंदसे मोहब्बत की महक आती है,’ परंतु आज या देशाला कुणाची तरी नजर लागली आहे. यासाठी आपण मिळून दुआ करूया की, येथे सुख, शांती, समृद्धी नांदू दे. सर्वांच्या समस्या दूर होऊ दे. एकोपा व भाईचारा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

जामा मशीद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, म. न. पालिकेचे माजी नगरसेवक अशोक कानडे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले, संजय छल्लारे, लकी सेठी, दीपक कदम, जयंत चौधरी, भाऊसाहेब मुळे, विजय खाजेकर, तहसीलदार राजेंद्र वाक्चौरे, डिवायएसपी संदीप मिटके, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पो. नि. हर्षवर्धन गवळी, नाना पाटील, महेंद्र त्रिभुवन, किशोर त्रिभुवन, संदीप मोकळ, अरुण मोकळ, तलाठी राजेश घोरपडे आदी उपस्थित होते.

जामा मशीदमध्ये डॉ. राज शेख, माजी नगरसेवक मुख्तार शाह, रज्जाक पठाण, तनवीर रजा, जावेद शेख यांनी स्वागत केले. महिनाभर रमजान निमित्त रमजान, कुरआन व इस्लाम धर्माबद्दल मौलिक माहिती दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मशीद ट्रस्टने सत्कार केला. मौलाना मोहम्मद ईमदादअली यांनी प्रवचन केले. मुफ्ती अतहर हसन यांनी नमाजची ईमामत केली. जामा मशिदीचे विश्वस्त शकूरभाई शेख यांची कमतरता यावेळी जाणवली. ईदगाहमध्ये मुफ्ती रिजवानुल हसन शेख यांनी प्रवचन दिले.

नमाजची इमामत मौलाना सय्यद अकबर अली काझी यांनी केली. यावेळी लखनऊ येथील मदरसा नदवातुल उलेमाचे मुफ्ती अब्दुल्लाह मखदुम हुसेन प्रमुख उपस्थित होते. ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मुझफ्फर शेख व सहकार्‍यांनी स्वागत केले. पोलिसांतर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ‘ईद मुबारक’ म्हणत स्वागत करण्यात आले. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, पो. नि. गवळी व सहकार्‍यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प दिले.

Back to top button