ईदनिमित्त पिंपरी बाजारात मिठाई, कपडे खरेदीस गर्दी | पुढारी

ईदनिमित्त पिंपरी बाजारात मिठाई, कपडे खरेदीस गर्दी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मुस्लिमबांधवांचा पवित्र सण रमजान ईद अगदी दोन दिवसांवर आलेला आहे. यानिमित्त नवीन कपडे व इतर सर्व नव्या वस्तूंनी बाजारपेठ सध्या सजली आहे. कपडे, मिठाई तसेच गरजेच्या वस्तूंची दुकाने थाटली आहेत. पिंपरी कॅम्पात मुस्लिमबांधव ईदची तयारी मोठ्या उत्साहात करताना दिसत आहेत.

सण म्हटला की, खाण्यापिण्याची मौजमजा असते. रमजाननिमित्त एक महिना मुस्लिमबांधव उपवास करतात. रमजान दिवशी हा उपवास सोडला जातो. मुस्लिमबांधव यादिवशी शिरखुर्मा हा पदार्थ करतात. एकमेकांना शुभेच्छा देऊन सहपरिवार आणि नागरिक यांच्याबरोबर शिरखुर्म्याचा आस्वाद घेतात.

रंगीत शेवई, सुकामेवा
ईद सणात केला जाणारा सर्वात स्पशेल पदार्थ म्हणजे शिरखुर्मा यासाठी लागणार्‍या वस्तू सुका मेवा, रंगीत शेवया घेण्यासाठी बाजारात लावलेल्या स्टॉलवर तुडूंब गर्दी होत आहे. फेणीमध्येही यंदा वेगळे प्रकार आले आहेत. यात बनारस अर्थात पातळ असलेली शेवई उपलब्ध आहे. तसेच भाजलेल्या तयार अशा खिमामी फेणीला चांगली मागणी आहे. शिरखुर्म्यासाठी लागणार्‍या सुक्या मेव्याचे साहित्य बाजारपेठेत रस्त्या-रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवले आहे.

मेंदी व सौंदर्य प्रसाधने
ईदसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी नवे कपडे आणि सर्व सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यात कुटुंबे मग्न आहेत. ईदसाठी मेंदीही आवश्यक असल्याने महिला वर्गाने सौंदर्यप्रसाधनांबरोबरच मेंदीची खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात केली. बाजारात पुरुषवर्ग पठाणी कुर्ता व त्यावर घालण्यात येणारी टोपी, शेरवानी, सुगंधी अत्तरे घेण्यात मशगुल झाला होता.

सलवार अन् पठाणी कुर्ते
बाजारपेठेत महिलांसाठी ईद सणाला खास तयार करण्यात आलेले डिझायनर सलवार कुर्ता, साडी, शरारा, पाकिजा असे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. तर पुरुषांमध्ये पठाणी कुर्त्याला मागणी असते. तसेच दस्तरखान, नमाजाची टोपी, मखनी आदी वस्तूंचीदेखील खरेदी जोरात सुरू आहे. नमाज टोप्यांमध्ये काश्मीरी टोपी, अफगाणी टोपी, वर्क केलेल्या टोप्या, वेल्वेटच्या टोप्या उपलब्ध आहेत.

अत्तरांचा दरवळ
याबरोबरच सुरमा व सुगंधी अत्तरांचे वेगवेगळे प्रकार बाजारात विक्रीस ठेवण्यात आले आहेत. सुरम्यामध्ये महिलांसाठी लाल, हिरव्या रंगाचे सुरमे तर पुरुषांसाठी काळा सुरमा खरेदी केला जात आहे. रमजान खरेदीत अत्तर खरेदी हा एक आवडीचा भाग समजला जातो. प्रत्येकाला वेगवेगळा अत्तराचा सुगंध आवडतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे अत्तराला पसंती देतात. बुजुर्ग बांधवांची पसंती पारंपरिक अत्तरांना अधिक असते. तर तरुणाईचा कल पारंपरिक अत्तरांप्रमाणेच नव्या सुगंधांकडेही असतो.

Back to top button