अवकाळी गारांनी धुतले, रस्ते जलमय ; सोसाट्यांचा वारा, विजांच्या कडकडाटाने पुणेकर भयभीत | पुढारी

अवकाळी गारांनी धुतले, रस्ते जलमय ; सोसाट्यांचा वारा, विजांच्या कडकडाटाने पुणेकर भयभीत

पुणे : टीम पुढारी :  शहरातील कात्रज, कोंढवा, धनकवडी, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, आंबेगाव आणि फुरसुंगीसह उपनगरांत शनिवारी दुपारनंतर जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वार्‍यासह ठिकठिकाणी गाराही पडल्या. कात्रज घाटात गारांचा थर साचल्याने वाहतूक मंदावली. बिबवेवाडीसह काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कात्रज, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, दत्तनगर, आंबेगाव परिसरात दुपारनंतर ढग दाटून आले. दुपारी तीनच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याच्या घटनाही घडल्या. दत्तनगर येथील विजेच्या रोहित्राला लागलेली आग कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.

बिबवेवाडी परिसरात त्रेधातिरपीट
बिबवेवाडी व मार्केट यार्ड परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडली. काही ठिकाणी गाराही कोसळल्या. लहान मुले गारा वेचण्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून आले. सुमारे दीड तास पाऊस सुरू होता. अप्पर डेपो, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, आंबेडकरनगर, धान्यबाजार, भाजी मार्केट, झोपड पट्ट्यांच्या भागातून मोठ्या प्रमाणाचा पाणी वाहिले.
फुरसुंगी परिसरात मध्यम पाऊस- फुरसुंगी : फुरसुंगी, उरुळी देवाची परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी या ठिकाणी देखील थोडा वेळ पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठले होते. यामुळे मंतरवाडी चौक, हांडेवाडी चौक, भेकराईनगर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

धनकवडी परिसरात पाणी पाणी…
आंबेगाव पठार, धनकवडी, बालाजीनगर, गुलाबनगर परिसरातही गारांचा वर्षाव झाला. या भागात तासभर पडलेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. त्रिमूर्ती चौकात काही काळ पावसाचे पाणी साचून वाहतूक संथगतीने सुरू होती. दत्तनगरकडे जाणार्‍या राजमाता भुयारी मार्गातही गुडघ्याइतके पाणी साठल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. चंद्रभागा चौक, आंबेगाव पठार, जिजामाता चौक, तीन बत्ती चौक परिसरातील रस्तेही जलमय झाले होते. काही ठिकाणी गाराही पडल्या. या पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. धनकवडी, बालाजीनगर येथे पथारी व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडल्याचे चित्र दिसून आले.

Back to top button