Stock Market Closing | शेअर बाजारावर अमेरिकेतील मंदीचे सावट! IT स्टॉक्स गडगडले, बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजारावर अमेरिकेतील मंदीचे सावट! IT स्टॉक्स गडगडले, बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी

Stock Market Closing : अमेरिकेतील सौम्य स्वरुपाच्या मंदीने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. याचे पडसाद आज गुरुवारी शेअर बाजारात उमटले. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १०० अंकांनी घसरून ६०,२९० वर आला. तर निफ्टी १७,७९० वर होता. त्यानंतर दुपारच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी खाली आला. त्यानंतर बाजार बंद होण्याच्या आधी दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्ह्यात आले. सेन्सेक्स ३५० अंकांचे नुकसान मागे टाकत स्थिर पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ३८ अंकांच्या वाढीसह ६०,४३१ वर बंद झाला. तर निफ्टी १५ अंकांनी वाढून १७,८२८ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात IT स्टॉक्स घसरले. तर बॅँकिंग स्टॉक्समध्ये तेजी राहिली.

IT स्टॉक्स गडगडले

IT स्टॉक्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा आदी दिग्गज आयटी शेअर्सनी लाल चिन्ह्यात व्यवहार केला. तर फार्मा, ऑटो, FMCG शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आयटीमधील १० पैकी ९ कंपन्यांचे नुकसान झाले. त्यात टेक महिंद्रा, इन्फोसिस, LTIMindtree, Persistent Systems, एचसीएल टेक्नॉलॉजीस, टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस, सोनाटा सॉफ्टवेअर, विप्रो, MphasiS यांचा समावेश होता. हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. (Stock Market Closing)

‘हे’ होते टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, एलटी, विप्रो हे शेअर्स घसरले होते. हे शेअर्समध्ये १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सन फार्मा, टाटा स्टील, अल्ट्राटेक, ॲक्सिस बँक, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, एम अँड एम हेदेखील घसरले होते. बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, मारुती, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय हे शेअर्स वधारले.

ऑटो स्टॉक्स वधारले

आजच्या व्यवहारात आयशर मोटर्स (३.१६ टक्के वाढ), टीव्हीएस मोटर (२.४९ टक्के वाढ), टाटा मोटर्स (०.८९ टक्के वाढ), मारुती सुझूकी (०.७३ टक्के वाढ), अशोक लेलँड (०.५५ टक्के वाढ) हे ऑटो स्टॉक्समधील टॉप गेनर्स होते.

AU Bank चा शेअर्स १७ टक्क्यांहून अधिक वाढला, मागे ‘हे’ होते कारण

एयू स्मॉल फायनान्स बँकेचे (AU Small Finance Bank) शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात १७ टक्क्यांहून अधिक वाढले. कंपनीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून आणखी तीन वर्षांच्या मुदतवाढीसाठी नियामक मान्यता मिळाल्यानंतर या बँकेचे शेअर्स वधारले. त्यासोबतच IDBI Bank, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक
हे शेअर्सही वाढले. निफ्टी बँकेने आज ४२ हजाराचा टप्पा पार केला.

उत्तर पश्चिम रेल्वेकडून ६३० दशलक्ष रुपयांच्या ऑर्डरसाठी कंपनीला पत्र मिळाल्याने रेल्वे विकास निगमचे शेअर्स ३ टक्के वाढले. HDFC बँकेने एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँके ऑफ कोरियाशी ३०० दशलक्ष डॉलर क्रेडिट लाइनसाठी करार केल्यानंतर HDFC बँकेचे शेअर्सही वधारले.

अमेरिका, आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

फेडरल रिझर्व्हच्या अर्थतज्ज्ञांनी यावर्षी सौम्य मंदी राहणार असल्याचे गुरुवारी सांगितल्यानंतर आशियाई शेअर बाजारांमध्ये संमिश्र वातावरण राहिले. शांघाय आणि हाँगकाँग येथील बाजार घसरले तर टोकियो आणि सेऊल येथील बाजारात तेजी होती. अमेरिकी प्रशासनाने महागाई वाढल्याचे सांगितल्यानंतर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक काल बुधवारी घसरून बंद झाले होते. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.१ टक्के खाली येऊन ३,३२४ वर स्थिरावला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक वाढून २८,१०८ वर राहिला. हाँगकाँगमधील हँग सेंग निर्देशांक ०.९ टक्के घसरून २०,१२५ आला. तर अमेरिकेतील एस अँड पी निर्देशांक १६ अंकांनी घसरून ४,०९१ वर आला. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ३८ अंकांनी घसरून ३३,६४६ वर होता. नॅस्डॅक कंपोझिटने १०२ अंक गमावले होते. यामुळे निर्देशांक ११,९२९ वर आला. (Stock Market Closing)

 हे ही वाचा :

Back to top button