एखादा गुंतवणूकदार एखाद्या शेअरवर किंवा लाभांशावर सात वर्षांपर्यंत कोणताही दावा करत नसेल, तर त्याची रक्कम आयईपीएफमध्ये ट्रान्सफर करण्यात येते. आयईपीएफ म्हणजे नेमके काय? जुने शेअर आणि लाभांशासाठी दावा कसा करू शकतो?
सुमारे दोन दशकांपूर्वी लोकांना शेअर खरेदी केल्यानंतर फिजिकली प्रमाणपत्र दिले जात होते. दीर्घकाळपर्यंत गुंतवणकूदारांना अनेक वर्षे शेअरचे प्रमाणपत्र सांभाळून ठेवावे लागत असे. परंतु सरकारकडे अशी काही प्रकरणे आली की, त्यात गुंतवणूकदारांनी कोणत्या ना कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि बरीच वर्षे झाल्यानंतर गुंतवणूकदार ती गुंतवणूक विसरून गेल्याचे निदर्शनास आले. यादरम्यान, त्या कंपनीच्या शेअरने बाजारात चांगला परतावा दिला. त्यानंतर गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सना डीमॅट खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी चकरा माराव्या लागत असत. या समस्येपासून तोडगा काढण्यााठी सरकारने गुंतवणूक शिक्षण आणि सुरक्षा निधी (आयईपीएफ)ची स्थापन केली.
गुंतवणूक शिक्षण आणि सुरक्षा निधी (आयईपीएफ) ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कंपनी कायदा 2013 च्या कलम 125 नुसार, 7 सप्टेंबर 2016 रोजी स्थापन करण्यात आली. आयईपीएफच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या निधीची उभारणी गुंतवणूकदारांना शेअरची रक्कम परत करणे, दावा न केलेला लाभांश परत देणे तसेच गुंतवणूकदारांत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या हिताचे संरक्षण करणे यासाठी त्याची स्थापना करण्यात आली. एखादा गुंतवणूकदार एखाद्या शेअरवर किंवा लाभांशावर सात वर्षांपर्यंत कोणताही दावा करत नसेल, तर त्याची रक्कम आयईपीएफमध्ये ट्रान्सफर करण्यात येते.
दावा करण्याची प्रक्रिया
सुरुवातीला आपल्याला कॉपोरेर्र्ट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवावे लागेल. या नोंदणीत नाव, जन्मतारीख, पत्ता, शहर, राज्य, देश, पिनकोड आणि मेल आयडी नमूद करावा लागेल. शेवटी आपल्याला पासवर्ड सेट करावा लागेल. यात स्पेशल कॅरेक्टरचा समावेश करून पासवर्ड मजबूत करता येईल.
नोंदणी केल्यानंतर आपल्याला एमसीए सर्व्हिसमध्ये इन्व्हेस्टर सर्व्हिसवर क्लिक करावे लागेल.
इव्हेस्टर सर्व्हिसमध्ये क्लिक केल्यानंतर आरआरपीएफ 5 फॉर्मचा पर्याय दिसेल.
आयआरपीएफ 5 फॉर्मवर क्लिक करा.
आयआरपीएफ 5 फॉर्ममध्ये नॉर्मल फिलिंगवर क्लिक करा.
या अर्जातील पहिल्या क्रमांकावर पुन्हा एकदा आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, शहर, राज्य, देश, पिनकोड तसेच पॅनकार्ड नंबरदेखील भरावा लागेल. दुसर्या क्रमांकावर ज्या कंपनीच्या शेअरवर आणि लाभांशावर दावा करायचा आहे, त्या कंपनीचे नाव, कंपनीचा सीआयएन नंबर आणि कंपनीची ईआयडी भरावा लागेल. तिसर्या क्रमांकाचा रकाना भरताना शेअर आपल्याच नावावर असेल तर 'नो' म्हणून क्लिक करा.
त्यानंतर आपल्याला शेअरवर दावा करायचा असेल तर शेअरवर क्लिक करा. याशिवाय लाभांशावर दावा करायचा असेल तर अमाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर पुढील पेज सुरू होईल. तेथे आपले बँकेचे विवरण आणि डीमॅट अकाऊंट याचे संपूर्ण विवरण भरावे लागेल.
यानंतर आधार कार्ड, पासपोर्ट आणि शेअर आणि लाभांशाशी निगडित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर मोबाईलवर नंबरवर एक ओटीपी येईल. शेवटी ओटीपी जमा केल्यानंतर एसआरएन नंबर येईल आणि त्यावर क्लिक करा. यानुसार आपला अर्ज ट्रॅक करू शकता.
आयईपीएफचे अधिकारी कंपनीच्या नोडल ऑफिसर आणि रजिस्ट्रारला अर्जाची माहिती कळवेल. नोडल अधिकार्यांकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर आयईपीएफ अॅथोरिटीला मंजूर केलेला पडताळणी अहवाल सादर केला जाईल. आयईपीएफ अॅथोरिटी ही दाव्याची प्रक्रिया साधारणपणे 60 दिवसांत पूर्ण करेल.
राधिका बिवलकर