केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या रविवारी गोव्यात | पुढारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या रविवारी गोव्यात

पणजी; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी ( दि.१६) रोजी गोव्यात येणार आहेत. दक्षिण गोव्यात जाहीर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रारंभ ते करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीला केवळ ११ महिने बाकी असून मागील निवडणुकीत हातातून निसटलेली दक्षिण गोव्याची जागा यावेळी जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठीच अमित शहा हे दक्षिण गोव्यात सभा घेणार आहेत.

आगामी वर्षातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आधीपासूनच ‘मिशन २०२४’ ला सुरुवात केली आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ भाजपने २०१४ मध्ये जिंकला होता. मात्र, २०१९ मध्ये मगो पक्षाने भाजपची साथ सोडल्यामुळे भाजपचे उमेदवार तत्कालीन खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर हे पराभूत झाले होते. फोंडा तालुक्यातील तीन मतदार संघासह सावर्डे व केपेमध्ये मगोच्या मतदारांची संख्या मोठी आहे. यावेळी मगो भाजपसोबत सरकारमध्ये असल्याने लोकसभेसाठी मगोची साथ भाजपला लाभू शकते यामुळे अमित शहा गोव्यात येणार आहेत.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. मात्र, दक्षिण गोव्याचे खासदार काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दीन आहेत. भाजपने २०१९ मध्ये गमावलेल्या सुमारे ९० लोकसभा मतदार संघावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. त्यात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ असून हा मतदारसंघ पुन्हा घेण्यासाठी भाजपने यापूर्वीच केंद्रीय लघुउद्योग खात्याचे मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व केंद्रीय आयटी तथा कौशल्य विकास उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या दोन नेत्यांकडे भाजपने मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.

हेही वाचा : 

Back to top button