पिंपरी : बसथांब्यांवर शेडअभावी प्रवासी उन्हात | पुढारी

पिंपरी : बसथांब्यांवर शेडअभावी प्रवासी उन्हात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरात पीएमपीएमएलच्या काही बसथांब्यावर शेड नाही. काही ठिकाणी शेड आहेत, मात्र त्या तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे. पर्यायाने, त्यांना मनस्ताप वाढला आहे. इंद्रायणीनगर, दिघी परिसरात बसच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे नागरिकांना बसची प्रतीक्षा करत थांबावे लागते. सध्या उन्हाचा तडाका वाढला आहे. त्यातच बसथांब्यावर शेड नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन येथील बसथांब्यांवर शेड बसविण्याचे काम करायला हवे, अशी प्रवाशांची मागणी आहे. त्याचप्रमाणे, कडक उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक बसथांब्यावर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई असायला हवी.

प्रवाशांना शेडसाठी शोधावा लागतो आसरा
भोसरी येथील भोसरी-आळंदी रस्ता चौकात प्रवासीजवळच असलेल्या राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील सावलीत थांबतात. त्यामुळे बस आल्यावर त्यांची एकच धावपळ उडते. आळंदी रस्त्यावरील शास्त्री चौकातील थांब्यावरील प्रवासी झाडाच्या सावलीचा आधार घेतात. दिघी रस्त्यावरील मॅगझीन चौकात थांबा असलेल्या लेनला बसचालक बस आणत नसल्याने मधल्या लेनमध्ये प्रवाशांना उन्हात ताटकळत थांबावे लागते. किंवा दुकानासमोरील शेडमध्ये जाऊन थांबावे लागते.

कोठे आहे शेडची गरज

भोसरी : पीएमटी चौकाजवळील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील थांबे. बीआरटीएस टर्मिनलजवळ हिंजवडी आणि आळंदीकडे जाणार्‍या बसेसचा थांबा. आळंदी रस्त्यावरील शास्त्री चौक, टेल्को रस्त्यावरील टेल्को कंपनीजवळ.

इंद्रायणीनगर : इंद्रायणीनगर स्पाइन रस्त्यावरील आरटीओ थांबा. ग्लोरिअस पार्क संतनगर, द्वारकाविश्व थांबा. बालाजीनगरातील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाजवळील थांबा. पिंपरी-नेहरूनगर मार्गावरील इंद्रायणी कॉर्नर.

दिघी : दिघी विठ्ठल मंदिराजवळील भारतमातानगर-आळंदी रस्ता आदी भागाला जोडणार्‍या रस्त्यावरील पीएमपी बस थांबा.

उपाययोजना करायला हव्या
पीएमपीएमएल बसथांब्यांवर शेड उभारण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करायला हवी. जेणेकरून ऐन उन्हाळ्यात नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर होईल. तसेच, भोसरी, इंद्रायणीनगर आणि दिघी परिसरातील बसेसच्या फेर्‍या वाढविण्यात याव्या. त्याचप्रमाणे, बसथांब्यांवर पिण्याची पाण्याची सोय केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

Back to top button