मंचर : उष्माघाताने कोंबड्या पडताहेत मृत्युमुखी ! पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका | पुढारी

मंचर : उष्माघाताने कोंबड्या पडताहेत मृत्युमुखी ! पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका

संतोष वळसे पाटील

मंचर : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्माघाताने कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उष्ण वातावरण नियंत्रित करण्यासाठी पोल्ट्री शेडवर ठिबक सिंचन तसेच सिंटेक्सच्या टाक्यांना बारदान लावून पाणी थंड ठेवण्याचा प्रयत्न पोल्ट्रीचालक करीत आहेत.

सध्या उन्हामुळे कोंबड्यांची मर वाढू लागली असून, यावर उपाय म्हणून पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्री शेडवर पाचट टाकून तसेच त्यावर ठिबकद्वारे पाणी सोडत आहेत. त्याच्या आजूबाजूने हिरवी नेट बांधून पोल्ट्री शेडमधील वातावरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्रॉयलर कोंबडीच्या अंगी असणारी उष्णता तसेच वातावरणातील उष्णता यामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पोल्ट्री व्यावसायिक यावर उपाय म्हणून पोल्ट्री शेडवरील सिमेंट पत्रे थंड राहतील याची काळजी घेत आहेत. पत्रे तापू नये म्हणून पत्राच्या आतील बाजूनेही तुषार सिंचन केले जात आहे.

वातावरण नियंत्रित करण्याच्या खर्चात वाढ
उष्माघाताने कोंबड्या मरू नये, यासाठी अनेक उपाय करून ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करण्याचा आटोकाट प्रयत्न पोल्ट्री व्यावसायिक करीत आहेत. काही पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्यांना थंडावा मिळावा म्हणून पंख्यांची सुविधा केली आहे. त्यामुळे कोंबड्यांपासून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा सध्या वातावरण नियंत्रित करण्यासाठी होणार्‍या खर्चाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

उन्हाळ्यातील पोल्ट्री संगोपन व्यवस्थित व्हावे, यासाठी पोल्ट्रीचालक वेगवेगळे प्रयोग करून पोल्ट्री शेडमधील उष्ण वातावरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये बर्‍यापैकी यश येत असले, तरी नैसर्गिक वातावरणासारखे हे परिणाम देऊ शकत नाही.

      – शफीभाई मोमीन आणि मनोज बेंडे, पोल्ट्री व्यावसायिक, शिनोली आणि मंचर

Back to top button