गोवा : आरोग्य खात्यासाठी 2324 कोटींची तरतूद | पुढारी

गोवा : आरोग्य खात्यासाठी 2324 कोटींची तरतूद

पणजी : पुढारी वृत्तसेवा : अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी 2324.65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोमेकॉमधील रुग्णांच्या औषधासाठी 233.49 कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय गोमेकॉमध्ये जनौषधी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात या घोषणा केल्या.

गोमेकॉमधील साधन सुविधांचा विकास करण्यासाठी 172 कोटींची तरतूद केली आहे. यामध्ये गोमेकॉ आवारात टीबी इस्पितळ बांधण्यासाठी 157.30 कोटी रुपये तर रक्तपेढी बांधण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येथे नवे व्याख्यान सभागृह बांधण्यासाठी 30.74 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री मेडिक्लेम योजनेंतर्गत 8 लाख वार्षिक उत्पन्न असणार्‍या नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेसाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही जिल्यात 58 लाख रुपये खर्चून ऑटिझमी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या घोषणा

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
दोन्ही जिल्ह्यात नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अतिदक्षता विभागाची स्थापना
दक्षिण गोव्यातील आयुष इस्पितळ वर्षअखेर पूर्ण होईल
काकोडे कुडचडे आरोग्य केंद्रासाठी 68.95 कोटी रुपये

Back to top button