वाहनांना 12 किलोमीटरचा हेलपाटा ; बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावरील प्रकार | पुढारी

वाहनांना 12 किलोमीटरचा हेलपाटा ; बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावरील प्रकार

बेलसर : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम चालू झाले आहे. त्यामुळे काम होईपर्यंत हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. बेलसर-उरुळी कांचन मार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) ते वाघापूर या मार्गावरील वाहतूक एक महिन्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक 12 किलोमीटरचा हेलपाटा पडत आहे, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

पी एन-29 अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक 117 या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दि. 24 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ती वाहतूक जेजुरी-वाघापूर-टेकवडी-बोरीऐंदी तसेच सासवड- वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. हा मार्ग अत्यंत लांब असून एकपदरी असल्याने आंबळे मार्गे 12 किलोमीटरचा हेलपाटा तर बोरीऐंदी व माळशिरसमार्गे अधिक मोठा हेलपाटा प्रवाशांना पडत आहे.

भाविकांसाठीही महत्त्वाचा रस्ता
शिरूर तालुक्यासोबतच हवेली तालुक्यातील भाविकभक्त मोठ्या प्रमाणात मल्हारी मार्तंडाचे जेजुरीला येत असतात आणि या मार्गाने प्रवास करत असतात. परंतु या मार्गाचे काम चालू असल्याने नवीन वाहनचालकांना रस्ता शोधण्यास अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने दिशादर्शक फलकांची संख्या वाढवावी व पूल लवकरात लवकर चालू करून रस्ता वाहनांना जाण्यायोग्य करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Back to top button