कोपरगाव : आपत्तीत ‘एनडीआरएफ’ काम करते | पुढारी

कोपरगाव : आपत्तीत ‘एनडीआरएफ’ काम करते

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा: नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांना सुरक्षित जागी पोहोचविणे, त्यांना अन्नपुरवठा करणे, यासाठी शासनाने एक पथक तयार केले आहे. त्या पथकाला राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन.डी.आर.एफ) असे म्हटले जाते. या पथकात डॉक्टर, इंजिनिअर, श्वान अशा विशेष लोकांचा आणि पाळीव प्राण्यांचा समावेश असतो, अशी माहिती एन.डी.आर.एफ.पुणे येथील वरिष्ठ अधिकारी रोहित राठोड यांनी दिली.

अधिक माहिती देताना एन.डी.आर.एफचे जवान विकास राऊत म्हणाले की, अनेक युवकांचे स्वप्न हे राष्ट्र सेवा करण्याचे असते. या दलाच्या माध्यमातून देशाची राष्ट्र सेवा करता येते. त्यासाठी एच. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण होऊन बीएसएफ, एसएसबी, सीआयएसएफ, सीआरपीएफ , आयटीबीपी यापैकी एका दलात भरती होणे गरजेचे असते. या दलांमध्ये राहून 3 – 4 वर्ष सेवा द्यावी लागते. या दलात ठराविक काळात सेवा दिल्यानंतर या दलात सेवेसाठी पात्र ठरत असतो. या दलात येण्यासाठी आपण पात्र झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षण दिले जाते.नंतर एनडीआरएफ पथकात समावेश होतो.

समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, शालेय पोषण आहार विभाग, वाहतूक विभाग आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांना अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या अधिकार्‍यांनी नैसर्गिक व मनुष्यनिर्मित आपत्ती विषयक माहिती देत कशा प्रकारे आपली पूर्वतयारी असली पाहिजे तसेच पूर, भूकंप, रस्ते अपघात, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीच्या काळात कोणते उपाय, योजना तयार कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्रसंगी वरिष्ठ अधिकार्‍यांसह एन.डी.आर.एफचे 22 जवान उपस्थित होते. प्राचार्या हर्षलता शर्मा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पुणे विभाग एन.डी.आर.एफ.चे वरिष्ठ अधिकारी रोहित राठोड, जालिंदर फुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

Back to top button