भिगवणकरांनी अनुभवलं दातृत्वाच ‘विशाल’ मन.. | पुढारी

भिगवणकरांनी अनुभवलं दातृत्वाच 'विशाल' मन..

भिगवण : मैत्री ही आयुष्यभर असतेच,ती आयुष्यानंतर पुरते का तर ती जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी असु शकते याचा एक संदेश भिगवण मधील मित्रांनी दिला आहे.त्यांच्या या दातृत्वाची भिगवणकरांनीही कौतुक केले आहे. गेल्या महिन्यात रस्ता अपघातात जिवाभावाच्या मित्राला जीव गमवावा लागल्यानंतर त्याच्या दहावीच्या १९९९-२००० क्लासमेट ग्रुपच्या मित्रांनी मृत मित्राच्या मुलाच्या भविष्यातील शिक्षणासाठी तब्बल ८० हजार रुपयांची एफडीची तरतुद केली आहे. जेवढे रस्ते चांगले व सुसाट झाले तेवढे सुसाट वाहनांच्या बाहुगर्दीत अनेकांचे जीव कवडीमोल झाले आहेत.बऱ्याचदा रस्त्यावर फलक असतात की,सुरक्षित जा आपली घरी कोणीतरी वाट पहात आहे पण आपण नेमके तेच विसरतो आणि बऱ्याचदा काही वाईट घटना घडून जातात.

भिगवणमध्ये विशाल धवडे या विवाहित तरुणाच्या बाबतीत अशीच गेल्या महिन्यात दुर्दैवी घटना घडली. बारामती भिगवण रस्त्याच्या अपघातात जीव गेलेल्या आपल्या मित्रासाठी अश्रूंचा पुर घेऊन येणाऱ्या तरुणाईने फक्त ओठांपुरते सांत्वनाचे शब्द बोलले नाहीत तर आपल्या मित्राच्या पोटापाण्याचा व त्याच्या कच्च्याबच्च्यासाठी लागलीच भविष्याची सोय करण्याचा निर्धार केला आणि त्यांच्या या दातृत्वाला भिगवणकरांनी सलाम केला. घटना आहे भिगवण च्या विशाल कैलास धवडे या तरुणाची.भाकरीचा चंद्र शोधताना त्याने शोधलेला मार्ग स्वयंरोजगाराचा होता.

तो स्वयंरोजगाराचा मार्ग कुठेतरी सुखाचे दिवस दाखवत असतानाच त्याचा १२ एप्रिल रोजी बारामती भिगवण रस्त्यावर अपघातात मृत्यु झाला आणि पुढे काय असा प्रश्न कुटुंबासह मित्रपुढे उभा राहिला.आपल्या मित्राने हालअपेष्टा सोसत उभा केलेल्या त्याच्या व्यवसायातून घर चालत होते.पण आता पुढे काय होणार ? त्याच्या ११ वर्षाच्या अथर्व मुलाचे काय होणार ? तो पुढे कसा शिकणार अशी एक साशंकता वर्गमित्रांच्या मनाला चाटून गेली आणि क्लासमेट ग्रुपच्या त्याच्या मित्रांनी निर्णय घेतला यातुन आपल्याला जी शक्य आहे ती मदत द्यायची आणि मग बोलता बोलता एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी गेली व सगळेच मित्र तयार झाले.

सगळ्यांनी काही वेळातच तब्बल ८० हजार रुपये गोळा केले आणि विशालच्या मुलाच्या भविष्यातील शिक्षणाची तरतुद म्हणुन त्याची पोस्ट खात्यात पाच वर्षांसाठी एफडी केली. यावेळी विशालचे वडील कैलास धवडे,पोस्ट खात्याचे ईंचार्ज शिवाजी नागलगावे,पोस्टमन कांबळे,शिक्षक एच.एन.कांबळे व वर्गमित्र उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button