वाळकी : बाजार समितीसाठी 3931 मतदार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध | पुढारी

वाळकी : बाजार समितीसाठी 3931 मतदार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सोमवारी (दि.20) प्रसिद्ध केली. त्यामध्ये एकूण 3 हजार 931 मतदारांचा समावेश आहे. सोसायटी मतदारसंघात 1394, ग्रामपंचायत मतदारसंघात 1011, व्यापारी मतदारसंघात 1253, तर हमाल मापाडी मतदारसंघात 273 मतदार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे.

समितीच्या संचालक मंडळाच्या 18 जागा असून, त्यात सोसायटी मतदारसंघात सर्वाधिक 11 जागा आहेत. या 11 पैकी 7 जागा सर्वसाधारण गटासाठी असून, 2 जागा महिला राखीव आहेत. 1 जागा इतर मागास प्रवर्गासाठी, तर 1 जागा भटक्या जाती जमातीसाठी राखीव आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात 4 जागा असून, त्यातील 1 जागा अनुसूचित जातीसाठी व 1 जागा दुर्बल घटकासाठी राखीव आहे. व्यापारी मतदारसंघात 2 जागा, तर हमाल मापाडी मतदारसंघात 1 जागा आहे.

समितीच्या संचालक मंडळाची मुदत 2021 मध्येच संपली. मात्र, कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली. त्यामुळे संचालक मंडळाला दोनवेळा मुदतवाढ मिळाली. नंतर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. आता ही निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.

Back to top button