पुणे : सावित्रीबाई फुले सन्मानसाठी नावे जाहीर | पुढारी

पुणे : सावित्रीबाई फुले सन्मानसाठी नावे जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या कर्तबगार महिलांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गौरविण्यात येते. यंदा 2023 च्या गौरवमूर्ती महिलांची नावे विद्यार्थी विकास मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहेत.
यंदा ‘सावित्रीबाई फुले सन्मान’ सहा कर्तृत्ववान महिलांना जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये संगीतसाधनेत आयुष्य वेचणार्‍या ज्येष्ठ गायिका कमलताई भोंडे, अमरावती; प्रशासकीय अधिकारी आणि मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे, मुंबई; आदिवासीबहुल प्रांतात वंचित व वनवासींच्या सेवेत आयुष्य वेचणार्‍या हेमलताताई बिडकर, नाशिक; स्वकष्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपमहाव्यवस्थापकपदाला गवसणी घालणार्‍या प्रतीक्षा तोंडवळकर, मुंबई; महिला उद्योजिका आणि परिवहन व्यावसायिक जाई देशपांडे, सातारा; नांदेड येथील उद्यमी, नृत्य कलाकार आणि समाजजागृती कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. सान्वी जेठवानी या महिलांना जाहीर झाल्याचे विद्यार्थी विकास मंडळाकडून सांगण्यात आले.

या सन्मानाचे हे चौथे वर्ष असून, यंदा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शोध समितीने ही नावे निश्चित केली आहेत. लवकरच हा सन्मान समारंभ होणार असल्याचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी कळविले आहे.

Back to top button