पाटस येथे खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळला | पुढारी

पाटस येथे खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळला

पाटस(दौंड); पुढारी वृतसेवा : तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याबाबत खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याप्रकरणी पाटस (ता. दौंड) येथे खासदार संजय राऊत यांचा निषेध करीत पुतळा जाळण्यात आला.

पाटस (ता. दौंड) येथील भीमा पाटस साखर कारखाना चौकात मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता आमदार राहुल कुल समर्थक एकत्र आले. खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून ते खोटे आहेत तर आमदार राहुल कुल यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेऊन अतिशय कठीण परीस्थितीतून भीमा पाटस कारखाना सुरू केला आहे. आमदार राहुल कुल यांचा राज्यात नावलौकिक होत असताना राजकीय सूड भावनेतून त्यांच्यावर आरोप होत असल्याचे यावेळी कुल गट समर्थक बोलत होते.

यावेळी राऊत यांचा निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा दहन करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या निषेध सभेत संभाजी देशमुख, डॉ. मधुकर आव्हाड, बाळासाहेब तोंडे पाटील, साहेबराव वाबळे, संभाजी खडके, संजय शिंदे, अरुण भागवत, नामदेव शितोळे, हनुमंत भागवत, वसंत साळुंके, हनुमंत शितोळे उपस्थित होते. यावेळी कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पाटस पोलीस तैनात होते.

Back to top button