बुलढाणा : Breaking News,समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ ठार, ५ जखमी | पुढारी

बुलढाणा : Breaking News,समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ ठार, ५ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ एका भरधाव कारचा भीषण अपघात होऊन कारमधील ६ जण ठार तर ७ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१२) सकाळी घडली. मृतामध्ये कारचालक व चार महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तर जखमी झालेल्या सात जणांमध्ये चार बालकांचा समावेश आहे. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले. अपघातातील मृत व जखमी छत्रपती संभाजीनगर येथील एन-११, टीव्ही सेंटर भागातील रहिवासी आहेत.

या अपघातात चालक किरण राजेंद्र बोरूडे (वय ३५), हौसाबाई भरत बर्वे (वय ५०), श्रद्धा सुरेश बर्वे (वय३०), जान्हवी सुरेश बर्वे (वय १२), भाग्यश्री किरण बोरूडे (वय २७), प्रमिला राजेंद्र बोरुडे (वय ५२) यांचा मृत्यू झाला. तर नम्रता रविंद्र बर्वे (वय ३२), रूद्र रविंद्र बर्वे (वय १२), यश रविंद्र बेर्डे (वय १०), सौम्य रविंद्र बर्वे (वय ४), जतीन सुरेश बर्वे (वय ३), सुरेश भरत बर्वे (वय ३५), वैष्णवी सुनिल गायकवाड (वय १९) असे ७ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून १३ जण देवदर्शनासाठी कारमधून (MH 20 FU8962) समृद्धी महामार्गावरून भरधाव जात होते. यावेळी सिंदखेडराजा ते मेहकर दरम्यान शिवणीपिसा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने दुभाजकाला जोराची धडक दिली. यात कार पलटी झाल्याने कारचे छत तुटुन पडले. त्यात ४ महिला व १ मुलगी कारबाहेर फेकल्या गेल्याने मृत्यूमुखी पडल्या. या दुर्घटनेत कारचा चक्काचूर झाला.

हेही वाचा

Back to top button