बुलढाणा : पेपरफूट प्रकरणात आणखी दोन शिक्षकांना अटक; आरोपींची संख्या पोहोचली सातवर | पुढारी

बुलढाणा : पेपरफूट प्रकरणात आणखी दोन शिक्षकांना अटक; आरोपींची संख्या पोहोचली सातवर

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या इयत्ता बारावी गणिताच्या सोशल मिडीयावरील बहूचर्चित पेपरफूट प्रकरणात साखरखेर्डा पोलीसांनी आणखी दोन आरोपी शिक्षकांना अटक केली आहे. शेख अकील शेख मुनाफ (रा.लोणार), अंकूश पृथ्वीराज चव्हाण (रा.सावरगाव तेली ता.लोणार) अशी त्यांची नावे आहेत. अटकेतील आरोपींची संख्या आतापर्यंत सातवर पोहचली असून यात चार शिक्षक आरोपी आहेत.

पोलीसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीवरून, या पेपरफुटीची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी ३ मार्च रोजी इयत्ता बारावीच्या गणीताची प्रश्नपत्रिका सिंदखेडराजा तालुक्यातील काही गावांत व्हाट्सअपवरून व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर साखरखेर्डा परिसरातील राजेगाव परिक्षा केंद्र संशयाच्या घे-यात सापडले. गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार, शेंदूरजन व किनगावजट्टू येथील दोन शिक्षक व भंडारी गावातील अन्य तीघे अशा पाच आरोपींना अटक केली.  तसेच राजेगावसह अन्य चार परिक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख व पेपर रनर यांना तातडीने बदलण्यात आले व त्यांचे मोबाईल तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. यामुळे पेपरफुटीचा मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.

पोलीसांनी अटक केलेला आरोपी शिक्षक गोपाल दामोधर शिंगणे हा शेंदूरजन येथे कनिष्ठ महाविद्यालयाचा चालक आहेत. तेथील विद्यार्थी हे राजेगाव केंद्रावर परिक्षा देत आहेत. याच केंद्रावर शिक्षक शिंगणे याने उपकेंद्रप्रमुख म्हणून आपली वर्णी लावून घेतली होती. दुसरा आरोपी शिक्षक गजानन आढे हा किनगावजट्टू (ता.लोणार) येथील शिक्षणसंस्थेचा चालक असून त्याच्या संस्थेचे विद्यार्थी बिबी येथील केंद्रावर परिक्षा देत आहेत. या दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिक्षेत मदत करण्यासाठी गणिताची प्रश्नपत्रिका व्हाट्सअप वर उपलब्ध करण्याचा कट रचला असा आरोप आहे.

या दोघांनी काही शिक्षक, बारावीचे विद्यार्थी व अन्य व्यक्तींचा व्हाट्सअप गृप तयार केला. त्यावर गणिताच्या प्रश्नपत्रिकेची काही पृष्ठे व्हायरल केली. काही क्षणातच सिंदखेडराजा तालुक्यातील काही गावातून हे बिंग फुटले आणी वृत्तवाहिन्यांवर पेपरफुटीचे वृत्त झळकले. विधीमंडळातही हा विषय पोहचल्याने शिक्षण विभागही हादरला. पोलीसात तक्रार दाखल झाल्यानंतर मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व साखरखेर्डाचे ठाणेदार नंदकिशोर काळे व त्यांच्या पथकाने तपासाला गती देऊन आतापर्यंत पेपरफुटीतील सात संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचे गांभिर्य पाहून न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात गणिताचा पेपर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची सायबर शाखा पेपरफुटीतील लाभार्थ्यांना शोधून काढण्यात गुंतली आहे.सोशल मिडीयावरून पेपरफुटीचा किती प्रसार व परिणाम झाला? या पेपरफुटीचे लाभार्थी विद्यार्थी किती? यासाठी त्यांच्यात काय आर्थिक व्यवहार झाला? पेपरफुटीचे राज्यस्तरीय रॅकेट सक्रिय आहे काय? या प्रकरणाची व्याप्ती किती? याचप्रकारे आधीच्या विषयाचेही पेपर फुटले होते काय?याबाबतची तथ्ये शोधण्याच्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Back to top button