बुलढाणा: पेपरफुटी प्रकरणी अटकेतील चारही शिक्षक निलंबित | पुढारी

बुलढाणा: पेपरफुटी प्रकरणी अटकेतील चारही शिक्षक निलंबित

बुलढाणा- पुढारी वृत्तसेवा : इयत्ता बारावी गणिताच्या बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या चारही आरोपी शिक्षकांना जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये सेवेतून निलंबित केले आहे. हे शिक्षक विनाअनुदानित शाळांवर कार्यरत होते.३ मार्च रोजी इयत्ता बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका ही पेपर सुरू होण्यापूर्वीच सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांत सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या पेपरफुटी प्रकरणात पोलीसांनी तपासाचे धागे जुळवत चार शिक्षक व अन्य तीन व्यक्ती अशा सात आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या चारही आरोपी शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यातील गजानन आडे हा शिक्षक वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय किनगावजट्टू या संस्थेचा संचालक आहे.

दुसरा आरोपी शिक्षक गोपाल शिंगणे हा वच्छगुलाब शिक्षणसंस्था शेंदूरजनचा संचालक आहे. तिसरा आरोपी शिक्षक अंकूश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज लोणार येथे कार्यरत होता. चौथा आरोपी अ. अकील अ. मुनाफ हा झाकीर हुसैन उर्दू स्कूल लोणार येथे प्राचार्य पदावर कार्यरत होता.

गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याने या चार शिक्षकांसह भंडारी गावातील गणेश नागरे, पवन नागरे व गणेश पालवे असे सात आरोपी पोलीस कोठडीत आहेत. मेहकरचे एसडीपीओ विलास यामावार यांच्या नेतृत्वात पोलिसांचे विशेष तपास पथक पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.

Back to top button