पुणे : यंदा साखरेचे उत्पादन घटणार : संदीप तौर | पुढारी

पुणे : यंदा साखरेचे उत्पादन घटणार : संदीप तौर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा अतिरिक्त पाऊस झाल्याने ऊस गाळपावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे साखरेचे उत्पादन घटणार असल्याची माहिती व्यंकटेशकृपा साखर कारखान्याचे अध्यक्ष संदीप तौर यांनी दिली. याबाबत संदीप तौर म्हणाले, की राज्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्याच्या धोरणानुसार कारखाने सुरू करण्यात आले. मात्र, कारखाने सुरू होऊनही शेतात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे हंगाम सुरू होऊनदेखील ऊसतोडणी करता आली नाही.

ऊसतोडणी कामगारदेखील उशिरा दाखल झाले. तसेच अतिरिक्त पावसाचा परिणाम झाला.अनेकांना ऊस उत्पादन वाढेल असे वाटत होते. मात्र, अनेकांचे अंदाज फोल ठरले. ऊस उत्पादनात सर्वच ठिकाणी मोठी घट झाल्याचे पाहावयास मिळते. उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम रिकव्हरी व गाळपावर झाला आहे. अनेक कारखाने लवकर बंद झाले असून, तर काही कारखाने मार्चअखेरपर्यंत बंद होणार आहेत. कारखाना कार्यक्षेत्रात कुठेही ऊस शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत.

व्यंकटेश कृपा कारखान्याने आजअखेर 6 लाख 7 हजार 485 टन उसाचे गाळप केले आहे. पुढील हंगामात डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पावर भर देणार आहे. ऊसतोडणी कामगारांबाबतच्या अडचणींवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणावर आगामी काळात अधिक भर दिला जाणार आहे. दिवसेंदिवस साखर कारखानदारीतील अडचणी वाढत असून, कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही संदीप तौर यांनी सांगितले.

Back to top button